पश्चिम बंगालमधील जलपैगरी जिल्ह्यात एका १६ वर्षीय मुलीची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेक-यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. ११ वीमध्ये शिकत असलेली ही मुलगी खाजगी शिकवणीवरून घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या मारेक-यांनी तिच्यावर गोळी झाडली यामध्ये मुलीच्या डोक्याला गोळी लागून तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, निष्पाप मृत मुलीच्या पालकांनी तपस दास, अलियास खुडू या दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. काही दिवसांपासून हे मारेकरी तिचा पाठलाग करत असल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. याबाबत गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी फलास्का येथे गोपाल आचार्य आणि बिजित खुडू या दोघांना अटक केली. या दोघांची चौकशी केल्यावर तपस हा फलास्कापासून १०० किमीवरील सिलिगुरी भागात असल्याचे कळल्यानंतर त्याला तेथून अटक करण्यात आली आहे. तपस विरुद्ध यापूर्वीदेखील खून आणि पिळवणूक केल्याच्या गुन्ह्याची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.