Westarctica embassy in Ghaziabad Crime news : उत्तर प्रदेश पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये चक्क एका बनावट दूतावासाचा पर्दाफाश केला आहे. शहरातील कवी नगर भागात हा दूतावास चालवला जात होता. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान एकमेव आरोपी आणि सूत्रधार हर्षवर्धन जैन (४७) नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीबद्दल तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून या व्यक्तीकडे १२ डिप्लोमॅटिक पासपोर्ट आढळून आले आहेत. इतकेच नाही तर या व्यक्तीने गेल्या १० वर्षात जवळपास ४० देशांना भेटी दिल्या आहेत.

जैन याने भेटी दिलेल्या देशांमध्ये युएई, मॉरिशस, तुर्की, फ्रान्स, इटली, बल्गेरिया, कॅमेरून, स्वित्झर्लंड, पोलंड, श्रीलंका आणि बेल्जियम यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे जैन याच्या गाझियाबादमधील कवी नगर येथील भाड्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आणि त्यानंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.

४० देशांना भेटी

जैन याच्यावर त्याने आपण ‘वेस्टआर्क्टिका (Westarctica)’चे राजदूत असल्याचा दावा केल्याचा आरोप आहे. “तपासादरम्यान असे समोर आले आहे की जैन हा त्याच्या शेल कंपन्यांच्या व्यवस्थापनासाठी अनेक आखाती आणि युरोपीय देशांना भेटी देत होता,” असे सूत्रांनी सांगितले.

“काही कंपन्यांमध्ये त्याने स्वतःच नाव सेक्रेटरी म्हणून दिले आहे, तर इतर काहींमध्ये स्वतःला डायरेक्टर असल्याचे दाखवले आहे. त्याने जवळपास ४० देशांना भेटी दिल्या आहेत, ज्यामध्ये गेल्या १० वर्षात ३० फेऱ्या त्याने फक्त यूएईच्या केल्या आहेत.” असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी १२ देशांचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट देखील जप्त केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

चौकशीचा भाग असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुराव्यानुसार असे दिसून येते की जैन याने शेल कंपन्यांच्या माध्यमातून फेक बिझनेस डील्स ऑफर करून आणि परदेशातील लोकांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे कमावले. त्याने नेमकं किती लोकांना फसवलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस पथकांकडून केला जात आहे.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की त्यांनी जैनला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी शहरातील न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अटकेनंतर त्याच्या प्राथमि चौकशी केल्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गाझियाबादमधून हे फसवणुकीचे रॅकेट चालवण्याशी संबंध असलेले अर्धा डझनहून अधिक लोकांची ओळख पटवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासकर्त्यांनी जैनशी संबंधित किमान सहा बँक खाती यूएईमध्ये, तीन यूकेमध्ये, एक मॉरिशसमध्ये आणि एक भारतात आढळून आले आहे, अशी माहिती एसटीएफने दिली आहे.