भारतातील बलात्कार आणि  घरगुती हिंसाचाराच्या घटनांसाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण जबाबदार असल्याचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भारतीय संस्कृतीत असलेल्या प्रेमाच्या पावित्र्याने स्त्री-पुरुष संबंधांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळेच देशाला विश्वगुरूचा दर्जा मिळाला होता. त्यामुळे भारतीयांनी भोग, वासना आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने प्रेमाचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करण्याऐवजी त्याचे पावित्र्य जपावे. जेणेकरून भारतीय महिलांचा तिहेरी तलाक, तलाक, स्त्री-भृणहत्या आणि घरगुती हिंसेसारख्या घटनांपासून बचाव होऊ शकतो, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले.

इंद्रेश कुमार यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातही यासंदर्भात विधान केले होते. भारतीय संस्कृतीमधील प्रेम हे शुद्ध आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते. मात्र, पाश्चात्य संस्कृतीने ‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्यानिमित्ताने या प्रेमाचे बाजारीकरण केले. भारतच नाही तर जगातील अनेक देश या समस्येचा सामना करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लोकांना नैतिकता आणि माणुसकीची शिकवण दिली जाते, असे त्यांनी म्हटले.

यापूर्वी इंद्रेश कुमार यांनी गोमांस बंदीसंदर्भातही वादग्रस्त वक्तव्य केले होते. बीफ सेवन करणाऱ्या लोकांमुळे देशाची अब्रू जात आहे. त्यांचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे या लोकांनी आपल्या सवयी बदलाव्यात. सव्वाशे कोटींच्या भारतात फार थोडेजण गोमांसाचे सेवन करतात. त्यामुळे या लोकांना देशाच्यावतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचे हे कृत्य सैतानी असून माणुसकीला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे या लोकांना आपल्या पद्धती बदलल्या तर बरे होईल, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते.