What are these fuel control switches mentioned in AAIB Report on Air India Plane crash probe : एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे गेल्या महिन्यात १२ जून रोजी अहमदाबाद येथे कोसळले. या अहमदाबादहून लंडनला निघालेल्या बोईंग ७८७-८ विमानाला झालेल्या या अपघातात २६० जाणांचा मृत्यू झाला होता , ज्यापैकी २४१ हे प्रवासी होते तर १९ जण हे जमिनीवर ठार झाले होते. या दुर्घटनेच्या कारणांचा सध्या शोध घेतला जात आहे. यादरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इनव्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चा प्राथमिक अहवाल समोर आला असून यानंतर विमानातील एअरक्राफ्ट फ्युएल कंट्रोल स्विचेस हे या चौकशीच्या केंद्रस्थानी आले आहेत. हे स्विच बंद झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हे स्विच बंद कसे झाले? वैमानिकांनी ते चुकून बंद केले का? तसे ते विमान हवेत असताना बंद करता येतात का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

या रिपोर्टनुसार, हे स्वीचेस विमानाने टेक-ऑफ केल्याच्या काही सेकंदातच ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ स्थितीत बदलले होते, आणि यामुळे विमानाचा भीषण अपघात झाला. AAIBने जारी केलेल्या या प्राथमिक अहवालात कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” असे विचारताना ऐकू येत आहे. तर यावर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेले नाही’ हा संवादही अहवालातून समोर आला आहे.

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन पुरवठा करणारे स्विच बंद झाल्यामुळे दोन्ही इंजिन बंद झाले. वैमानिकांनी इंधन पुरवठा पूर्ववत केला, पण तोपर्यंत विमानाच्या वेग आणि उंचीत कमालीची घट झाली होती. ज्यामुळे अवघ्या ३० सेकंदात बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर विमान कोसळले.

या विमानाचे उड्डाण करणारे वैमानिक को-पायलट क्लाइव्ह कुंदर होते, तर पायलट-इन-कमांड सुमीत सभरवाल हे या विमानाचे मॉनिटरींग पायलट होते. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. या दोघांचाही अनुभव पुरेसा होता.

सध्या चर्चेत असलेले हे फ्युएल स्विचेस म्हणजे काय?

फ्युअल स्विचेस हे विमानाच्या इंजिनमध्ये जाणारा इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतात. वैमानिक आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या अत्यंत महत्वाच्या स्विचेसची हालचाल ही जाणीवपूर्वक करणे आवश्यक असते आणि अपघाताने हे स्विचेस बंद किंवा सुरू करणे जवळपास अशक्य असते. या स्विचेसच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या बाजूला ब्रॅकेट देण्यात आलेले असतात. याबरोबरच एक स्टॉप लॉक यंत्रणा देखील देण्यात आलेली असते जी वैमानिकांना स्विच त्याच्या RUN आणि CUTOFF अशा कोणत्याही एका स्थितीवरून दुसर्‍या स्थितीत हलवण्यापूर्वी ते उचलावे लागते.

साधारणपणे हे स्विच विमान जेव्हा जमिनीवर असते तेव्हाच हलवले जातात, विमान उड्डाण करण्यापूर्वी इंजिन सुरू करण्यासाठी आणि ते जमिनीवर उतरल्यानंतर इंजिन बंद करण्यासाठी या स्विचचा वापर केला जातो. विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा त्याचे इतके नुकसान झाले असेल की विमानाच्या सुरक्षिततेसाठी इंधन पुरवठा बंद करावा लागणार असेल तरच उड्डाणादरम्यान दोन्ही स्विच हवलण्याची गरज पडते.

विमान हवेत असताना वैमानिकांना स्विच हलवण्याची गरज कधी पडू शकते?

इंजिन फेल झालं किंवा इंजिनाच्या कामगिरीबाबत मोठा बिघाड झाला किंवा इंजिनाला मोठी इजा झाली असेल तर अशा प्रकरणांमध्ये वैमानिकांना दोन्हीपैकी एक स्विच हलवण्याची गरज पडू शकते. अशा परिस्थितीत बिघाड असलेले इंजिन वैमानिक बंद करतात. यासाठी वैमानिकांना संबंधित इंजिनचे फ्युअल कंट्रोल स्वीच हे RUN स्थितीतून CUTOFF स्थितीत हलवावे लागते. यामुळे संबंधित इंजिनाचा इंधन पुरवठा लगेचच बंद होतो आणि ते बंद होते. जर वैमानिकांना वाटलं की बिघाड झालेले इंजिन सुरक्षितपणे पुन्हा सुरू केले जाऊ शकते , तर ते इंधन पुरवठा बंद करून तो लगेचच चालू करू शकतात.

हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अशा परिस्थितीत बहुतेकवेळा फक्त एक फ्युअल कंट्रोल स्विच हलवले जाते, दोन्ही नाही. अधुनिक विमाने ही एका इंजिनवर देखील अनेक तास चालू शकतात.

काय झाले असू शकते?

एआय १७१ विमान अपघाताबद्दल असं बोललं जातं की, या विमान दुर्घटनेच्या वेळी टेक-ऑफ करताना विमानाचे एक इंजिन बंद पडल्याची शक्यता आहे आणि वैमानिकाने चुकून बिघाड झालेल्या इंजिनऐवजी सुरू असलेले इंजिन बंद केले. पण याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैमानिक आणि तज्ज्ञांनी हे नमूद केले की विमान हवेत असताना इंजिन बंद करण्याची प्रक्रिया ही अत्यंत पद्धतशीर आणि पूर्ण: विचारपूर्वक तयार करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एक चेकलीस्ट असते ज्याच्या माध्यमातून इंजिन बंद करण्याचे वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आलेले असते. वैमानिक असंच सहजपणे करू शकतील, इतके ते सोपे नसते. यासाठी दोन्ही वैमानिकांना एकत्रितपणे काम करावे लागते आणि हे विमाना सुरक्षित उंचीवर खाली आल्यानंतर केले जाते. याबरोबरच अनावधानाने चुकीचे इंजिन बंद केल्याची घटना भूतकाळात क्वचितच घडली आहे.