Air India Plane Crash Mayday Call: गुजरातच्या अहमदाबाद विमानतळाहून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडियाच्या AI171 विमानाचा भीषण अपघात झाला. अपघात होण्यापूर्वी वैमानिकाने एअर कंट्रोल रूम अर्थात ATC ला मदतीसाठी MAYDAY असा शेवटचा संदेश पाठवला होता. यासंदर्भात DGCA कडून निवेदन जारी करण्यात आलं असून त्यात वैमानिकानं नेमका काय संदेश पाठवला, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
वैमानिकाने MAYDAY च्या कॉलला प्रत्युत्तर दिल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती नागरी उड्डान महासंचालनालयाने (DGCA) एका निवेदनात दिली आहे.
MAYDAY कॉल म्हणजे काय?
मेडे (MAYDAY) कॉल हा शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत जिथे धोक्याची शक्यता वाटते, तिथे वैमानिक मेडे कॉल देतो. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात मेडे कॉल हा तात्काळ गंभीर संकटाचा इशारा मानला जातो.
MAYDAY हा फ्रेंच शब्द असून “m’aider” पासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो, “मला मदत करा”
MAYDAY कॉल हा रेडिओ कम्युनिकेशनद्वारे ATC किंवा जवळच्या इतर विमानांना पाठवला जातो. आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविण्यासाठी किंवा वेळेवर हस्तक्षेप सुनिश्चित करण्यासाठी या संदेशाचा वापर करण्यात येतो.
कधी दिला जातो MAYDAY कॉल?
इंजिन बिघाड, हवामानातील गंभीर परिस्थिती, विमानातील तांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय आणीबाणी यासारख्या परिस्थितीमध्ये MAYDAY कॉल दिला जातो. MAYDAY कॉल मिळाल्यानंतर एटीसी किंवा संबंधित यंत्रणा बचाव कार्य करण्यासंबंधी समन्वय साधतात. तसेच विमानातील गंभीर परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करतात.
या विमानात २४२ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी १६९ प्रवासी भारतीय नागरिक होते. तर ५३ ब्रिटिश नागरिक होते. या प्रवाशांची संपूर्ण यादी आता समोर आली आहे.