whatsapp web scrolling problem : जगभरात सोशल मेसेजींग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अनेकांच्या दैनंदिन कामाचा तो एक भाग बनला आहे. दरम्यान आज अनेक वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेब वापरताना अडचणीचा समाना करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी यासंबंधी तक्रारी नोंदवल्या आहेत. वापरकर्त्यांच्या मते त्यांना व्हॉट्सॲप वेबमध्ये चॅट स्क्रोल करता येत नाहीये. त्यामुळे चॅटमधील जुने मेसेज पाहणे वापरकर्त्यांना कठीण जात आहे.

गेल्या काही तासामध्ये अनेक वापरकर्त्यांनी या अडचणीबद्दल एक्सवर पोस्ट केल्या आहेत. व्हॉट्सॲप वेबमध्ये काही बिघाड झाला आहे का? मी वर किंवा खाली स्क्रोल करू शकत नाहीये, अशी पोस्ट एका वापरकर्त्याने एक्सवर केली आहे. इतरही अनेक वापरकर्त्यांनी त्यांना देखील अशीच अडचण येत असल्याचे म्हटले आहे.

दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, “आज कोणाला व्हॉट्सअॅप स्क्रोलिंग करताना अडचण येत आहे का? कारण ऑफिसमधील ३ ते ४ जणांना आज व्हॉट्सअॅप वेब वापरताना नेहमीपेक्षा काहीसा विचित्र अनुभव आला, जर तुम्हाला देखील असाच अनुभव आला असेल तर मला सांगा… “.