मागच्या वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. राजकारणात सर्वोच्चपदापर्यंत पोहोचल्यानंतरही मनोहर पर्रिकर त्यांच्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जायचे. अनेकदा गोव्यात ते स्कूटरवरुन प्रवास करायचे. एकदा गोव्यात कानाकोना येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपण स्कूटर चालवणे का बंद केले ? त्याचे कारण सांगितले.
मला लोक भेटतात तेव्हा स्कूटरवरुन प्रवास करता का ? म्हणून विचारतात. पण आता मी स्कूटरवरुन प्रवास करत नाही. कारण माझ्या मनामध्ये कामाचेच विचार असतात. माझे मन दुसऱ्या विचारांमध्ये असताना मी स्कूटर चालवली तर अपघात होऊ शकतो त्यामुळे मी स्कूटर चालवणे बंद केले आहे असे त्यांनी कानाकोना येथे जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना सांगितले.
स्थानिक बाजारपेठेतून वस्तू आणायची असेल किंवा इतर कामांसाठी मनोहर पर्रिकर स्कूटरवरुन प्रवास करतात अशा बातम्या त्यावेळी माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हायच्या. देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवणाऱ्या मनोहर पर्रिकरांची मागच्या वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज सुरु होती. मागच्या दोन दिवसात त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. अखेर रविवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अखेरच्या दिवसातही मनोहर पर्रिकर गोव्याच्या दैनंदिन कामकाजात व्यस्त होते.