Where is Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी आरोग्यविषयक कारणं सांगितली होती. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचं कारण वेगळं असू शकतं असा दावा विरोधक करत होते. तसेच, धनखड काही दिवसांनी खरं कारण सांगतील असा अंदाजही विरोधी पक्षांमधील नेत्यांनी व्यक्त केला होता. मात्र, तसं झालं नाही. राजीनामा दिल्यानंतर धनखड हे सार्वजनिकरित्या समोर आले नाहीत, कोणालाही भेटले नाहीत. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणाचाही धनखड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विरोधक धनखड बेपत्ता झाल्याचा दावा करू लागले.
दरम्यान, विरोधी पक्षांचे नेते धनखड यांचा ठावठिकाणा कुठे आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतानाच माजी उपराष्ट्रपती हे टेबल टेनिस खेळण्यात व योगाभ्यास करण्यात व्यस्त असल्याचं वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केलं आहे. धनखड यांच्या जवळच्या लोकांनी पीटीआयला सांगितलं की ते सध्या नियमितपणे योगाभ्यास करत आहेत. तसेच घरातील सदस्य, मित्र व उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमधील कर्मचाऱ्यांबरोबर टेबल टेनिस खेळतात.
जगदीप धनखड हे सार्वजनिकरित्या कोणासमोर आले नसल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की “आम्ही लवकरच धनखड यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सर्वांना देऊ.”
विरोधकांनी व्यक्त केलेला संशय
काँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल म्हणाले होते की २२ जुलै रोजी आपल्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला. या घटनेला २० दिवस उलटले असून ते कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाही. ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी नाहीत. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या खासगी सचिवांनी फोन उचलला आणि सांगितलं की ते सध्या विश्रांती घेत आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून धनखड यांचा ठावठिकाणा आणि प्रकृतीची चौकशी केली होती. धनखड यांच्यावर सरकारचा काही दबाव आहे का असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला होता.