Who is Sudan Gurung, face of Gen Z revolt in Nepal : नेपाळ सरकारने फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्युब व एक्ससह एकूण २६ सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात नेपाळमधील तरुण रस्त्यावर उतरले. जेन-झी (Gen Z) पिढीतले तरुण-तरुणी यात आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला जेन-झी हे नाव देण्यात आलं आहे. या जेन-झींच्या आंदोलनानंतर अवघ्या काही तासांत नेपाळमधील सरकारची पिछेहाट झाली आणि त्यांनी समाजमाध्यमांवरील बंदीचा निर्णय मागे घेतला. मात्र, अनेक ठिकाणी तरुणांनी केलेल्या हिंसक आंदोलनात १९ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

तरुणांनी आंदोलनाद्वारे नेपाळ सरकारला समाजमाध्यमांवरील बंदी मागे घ्यायला लावली. तसेच पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, गृहमंत्री रमेश लेख यांच्यासह चार मंत्र्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, हे आंदोलन नेमकं कोणी उभारलं? कोणी इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांना रस्त्यावर उतरवलं? त्यांना रसद कोण पुरवतंय? याबाद्दल सर्वांच्या मनात कुतुहूल निर्माण झालं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ३६ वर्षीय सुदान गुरुंग हा या आँदोलनकर्त्यांचा नेता आहे.

कोण आहे सुदान गुरुंग?

सुदान गुरुंग (३६) हा ‘हामी नेपाल’ या संघटनेचा अध्यक्ष आहे. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने म्हटलं होतं की “आमच्या संघटनेने अधिकृतपणे मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. तसेच विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश परिधान करण्याचं व जवळ पुस्तकं ठेवण्याचं आवाहन केलं होतं. आम्हाला आमचा मोर्चा शांततामय असल्याचं दर्शवायचं होतं. मुळात शांततेच्या मार्गानेच आम्हाला आंदोलन करायचं होतं. समाजमाध्यमांवरील बंदीच्या (ब्लॅकआऊट) आधी ‘हामी नेपाल’ संघटनेने निषेध मोर्चाचा मार्ग, सुरक्षेसंबंधीची मार्गदर्शक तत्वे शेअर करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला होता.

सुदान गुरुंग कसा बनला जेन-झींच्या आंदोलनाचा चेहरा

गुरुंग पूर्वी केवळ एक कार्यक्रम आयोजक होता. २०१५ मधील भूकंपात त्याने त्याचा मुलगा गमावला. त्यानंतर तो आपत्ती निवारणाच्या कामात हिरिरीने सहभाग घेऊ लागला. धारण येथील बी. पी. कोइराला आरोग्य विज्ञान संस्थेच्या कारभारातील पारदर्शकतेसाठी त्याने आंदोलनाची हाक दिली होती. त्याच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध ‘घोपा कॅम्प’ आंदोलन पार पडलं. त्या आंदोलनामुळे त्याला ओळख मिळाली.

नेपाळमधील तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. या जेन-झी आंदोलनाचं नेतृत्व देखील सुदान गुरुंग करत आहे. त्याने समाजमाध्यमांवरून या आंदोलनाची हाक दिली होती. त्याने तरुणांना संघटित केलं आणि काठमांडूत आंदोलन उभं केलं. हे आंदोलन आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे.