राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी निवडणूक आयोगात प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. सुनावणी सुरू असताना शरद पवार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अभिषेक सिंघवी म्हणाले की, पक्षचिन्ह आणि नावाबाबत केलेल्या याचिकेतून राष्ट्रवादी पक्षातील पक्षांतर्गत निवडणुकीला आव्हान दिले जाऊ शकत नाही. पक्षांतर्गत ज्या निवडणुका झाल्या त्यात शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णपणे सहभाग घेतला होता. यावेळी या निवडणुकांना कोणताही विरोध केला नव्हता. गेल्या २० वर्षांहून अधिक जास्त वेळ निवडणुकीत सहभाग घेतल्यानंतर आरोप प्रत्यारोप करून ही निवडणूकच चुकीची आहे आहे असं म्हणणं बेकायदा आहे.
तसंच, या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानानुसारच झाल्या आहेत. पक्षाच्या नियमानुसार या निवडणुका झाल्या आहेत, असंही ते म्हणाले. पक्षातील आमदार संख्येनुसार पक्षाचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. परंतु, आमच्याकडेच सर्वाधिक आमदार आहेत. चार तारखेला पुढील सुनावणी होणार असून आमच्या बाजूने युक्तीवाद केला जाणार आहे. तर, त्यानंतर अजित पवार गटाची बाजू ऐकली जाईल, असंही ते म्हणाले.