पंतप्रधानांचे गौरवोद्गार

ज्याचे विचार आणि दृष्टिकोन हे नावीन्यपूर्ण आणि निर्णय पुरोगामी आहेत, असा भारत उदयाला येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ज्यात कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान नाही अशी रचना देशात निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

 व्यक्तीची प्रगती ही राष्ट्राच्या प्रगतीशी जोडली गेली असल्याचे मोदी यांनी ‘आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’च्या उद्घाटन समारंभात दूरसंवादाद्वारे केलेल्या प्रमुख भाषणात सांगितले आणि देशाच्या उत्थानासाठी प्रत्येकाच्या कर्तव्याला महत्त्व देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

 विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगतानाच, अशा प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्याची आणि देशाचे योग्य चित्र उभे करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 कर्तव्यावर भर देताना पंतप्रधांनांनी सांगितले की, ‘‘आपल्याला हे मान्य करायला हवे, की स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये आपला समाज, आपला देश आणि आपणा सर्वांना एक प्रकारच्या अस्वस्थतेने ग्रासले आहे. आपण आपल्या कर्तव्यांपासून दूर गेलो आणि त्यांना प्राधान्य दिले नाही, याची ही अस्वस्थता आहे.’’

 ‘बह्मकुमारीज’तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांचे उद्घाटन मोदी यांनी केले. यांत तीसहून अधिक मोहिमा, तसेच १५ हजारांहून अधिक कार्यक्रमांचा समावेश आहे. लोकांनी इतकी वर्षे केवळ आपल्या अधिकारांबाबत चर्चा केली व त्यांच्यासाठी लढा दिला, असे मोदी म्हणाले.

 अधिकारांबाबत बोलणे हे काही परिस्थितींमध्ये एका मर्यादेपर्यंत योग्य असू शकते, मात्र आपले कर्तव्य विसरण्याने भारताला दुर्बळ ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रत्येकाने एकत्रितपणे काम करावे, ज्यामुळे भारत नव्या उंचीवर पोहोचेल, असे आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘आपण सर्वांनी देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात दिवा प्रज्ज्वलित करायला हवा- कर्तव्याचा दिवा. एकत्र येऊन आपण देशाला कर्तव्याच्या मार्गावर पुढे नेऊ’, असे मोदी म्हणाले. समानता व सामाजिक न्याय यांच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला एक समाज निर्माण होत आहे, असेही मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.