मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातला चौथा टप्पा आज पार पडतो आहे. या मतदानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशात सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्यात दुजाभाव झाल्याचे पहायला मिळाले आहे. राज ठाकरे यांनी दोन तास रांगेत उभं राहून मतदान केलं. मात्र अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन या सगळ्यांना थेट मतदान केंद्रात जाता आलं.
अगदी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवदीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही रांगेत उभं राहून मतदान केलं. मात्र असं असतानाही बच्चन कुटुंबीयांना एक वागणूक आणि राजकारण्यांना एक असं का केलं गेलं? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना थेट प्रवेश का दिला गेला? रांगेचा नियम शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी पाळला तर मग सेलिब्रिटींना वेगळी वागणूक का देण्यात आली असेही विचारण्यात येते आहे.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. आणखी काही टप्पे बाकी आहेत मात्र महाराष्ट्रात आज या निवडणुकीचा चौथा आणि अखेरचा टप्पा होता. आज मुंबईमध्ये मतदान होतं त्यामुळे मुंबईत काय घडतंय मतदारराजा कुणाला कौल देतो हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहेच. मात्र सेलिब्रिटींना एक वागणूक आणि राजकारण्यांना, सामान्यांना वेगळी वागणूक का हा प्रश्न सगळ्याच स्तरातून उपस्थित होतो आहे.