सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरदार पटेल हे महात्मा गांधींचे शिष्य होते. शिष्याचे स्मारक झाले. मग भाजपाला सरदार पटेल यांचे गुरु असलेल्या महात्मा गांधी यांचा सर्वात उंच पुतळा का बांधता आला नाही, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पाच्या जवळ हा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शशी थरुर यांनी तिरुअनंतपुरम येथील काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली. थरुर म्हणाले, देशात गांधींचा इतका विशाल पुतळा का नाही?. भाजपाने महात्मा गांधींचे सर्वात उंच स्मारक का बांधले नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महात्मा गांधी यांचा सर्वात मोठा पुतळा सध्या संसद परिसरात आहे. पण त्यांचे शिष्य असलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. मग त्यांचे गुरु असलेल्या महात्मा गांधींचे त्यापेक्षा उंच स्मारक भाजपाला का बांधता आले नाही?. याचे उत्तर कदाचित भाजपाकडेही नसेल, असे त्यांनी सांगितले.

भाजपा नेते महात्मा गांधींच्या विचारधारेचे अनुकरण करत नाही आणि त्याचे प्रमुख कारण महात्मा गांधींची अहिंसेची शिकवण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे नेते भाजपाकडे नसल्याने त्यांना सरदार पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांचा आधार घ्यावा लागला, अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bjp had not built bigger statue for mahatma gandhi asks congress leader shashi tharoor
First published on: 01-11-2018 at 10:31 IST