पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाल्यापासून विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा बाहेर काढला आहे. ईव्हीएम सदोष असून आगामी निवडणुका VVPAT किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जातेय. ईव्हीएममुळेच भाजपाचा विजय होऊ शकला, असाही तर्क लावला जातोय. या दरम्यान, वकील प्रशांत भुषण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं एक जुनं वक्तव्य शेअर करून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. यासंदर्भात प्रशांत किशोर यांनी आज एक्सवर पोस्ट लिहिली आहे.

प्रशांत भुषण यांनी नितीन गडकरी यांचं २०१० सालातील एका वक्तव्याची बातमी आज शेअर केली. यामध्ये नितीन गडकरींनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. नितीन गडकरी म्हणाले होते की, “भाजपा ईव्हीएमविरोधात नाही. प्रणालीचे आधुनिकीकरण केले पाहिजे. आम्ही आधुनिकीकरण किंवा ईव्हीएमच्या विरोधात नाही. परंतु, आम्हाला फक्त कागदाचा आधार हवा.” म्हणजेच, सुरुवातीच्या काळात ईव्हीएमला भाजपाकडून प्रकर्षाने विरोध झाला होता. परंतु, आता भाजपा ईव्हीएमसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट होतंय.

हेही वाचा >> प्रशांत किशोर यांनी सांगितली भाजपाच्या विजयाची चार कारणं, काँग्रेसला सल्ला देत म्हणाले…

२०१० सालातील नितीन गडकरींचे हे वक्तव्य आता शेअर करत प्रशांत भुषण यांनी एक्स पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात की, भाजपा, मोदी सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोग VVPAT ला का विरोध करत आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार VVPAT मशिन्स बसवण्यात आल्या होत्या. अनेक मतदार आणि पक्षांनी ईव्हीएमवर अविश्वास दाखवलेला असताना VVPAT (मतं) का मोजले जात नाही? असा सवाल प्रशांत भुषण यांनी केला आहे.

पाच पैकी तीन राज्यात भाजपाने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसची सत्ता हिरावून घेत भाजपाने बहुमत स्पष्ट केलं. तर, मध्य प्रदेशातील सत्ता भाजपाने कायम राखली आहे. केवळ तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली असून मिझोराममध्ये झोरम पिपल्स मुव्हमेंट या पक्षाने सत्ता काबिज केली आहे. पाच राज्यापैकी भाजपाला तीन जागांवर विजय मिळाला असल्याने ही ईव्हीएमची कमाल असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय.