संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपशी घरोबा केला असला तरी जदयूचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने विदेशातील काळा पैशाबाबत दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण केलेले नाही अशी टीका करत यादवांनी पक्षाचीच कोंडी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जदयूचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार शरद यादव यांनी भाजपवर ट्विटरद्वारे निशाणा साधला. पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला. भारतात पनामा प्रकरणात नाव आलेल्या मंडळींवर कारवाई का  केली नाही असा सवाल शरद यादवांनी केंद्र सरकारला विचारला. तीन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपने विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले. पण अजून विदेशातील काळा पैसा परत आणलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी केली आणि सत्ता कायम ठेवली. मात्र नितीशकुमारांच्या या निर्णयावर शरद यादव नाराज असल्याची चर्चा आहे. शरद यादव यांनी मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यसभेत टीका केली होती. मात्र आता त्यांच्या पक्षाने भाजपशी जवळीक साधल्याने  त्यांची कोंडी झाली आहे. शरद यादव यांच्यासह १० आमदार आणि दोन खासदारही नितीशकुमारांवर नाराज आहेत. त्यामुळे सत्ता कायम ठेवण्यात यश आले असले तरी पक्षातील नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

नितीशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शरद यादव यांचा मला फोन आला. मी तुमच्यासोबत आहे, असे त्यांनी मला फोनवरून सांगितल्याचा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला होता. त्यामुळे शरद यादव आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why no action taken against names appeared in panama papers jdu leader sharad yadav asks modi government
First published on: 30-07-2017 at 17:09 IST