पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांची हे भेट विशेष ठरणार आहे. पॅरिस करारावरुन भारतावर केलेली टीका, एच१बी व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्यांना बसलेला हादरा आणि पाकिस्तानच्या कुरापती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील आठवड्यात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोदींच्या अमेरिका दौऱ्याबद्दल माहिती दिली होती. मात्र, त्यावेळी मोदींच्या अमेरिका दौऱ्याची तारीख निश्चित झाली नव्हती. अखेर काल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी मोदींना अमेरिका दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. मोदींनीदेखील हे आमंत्रण स्वीकारले होते.
पैशांसाठी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली नव्हती; स्वराज यांनी ट्रम्प यांना सुनावले
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही नेते ऐतिहासिक विजय मिळवून सत्तेत आले आहेत. त्यामुळे हे दोघेही कायम आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय असतात. या पार्श्वभूमीवर मोदी आणि ट्रम्प यांच्या २६ जूनच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या भेटीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे .ट्रम्प यांच्या ‘नेशन फर्स्ट’ धोरणामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदारांना बसलेला फटका हा या चर्चेतील प्रमुख मुद्दा असू शकतो. तसेच काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी पॅरिस करार झुगारून दिला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करताना भारत आणि चीनवर टीका केली होती. या कराराचा सर्वाधिक फायदा भारत आणि चीन यांना होणार असून हे अमेरिकेवर अन्याय करणारे ठरेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे २६ जूनच्या भेटीत मोदी आणि ट्रम्प यांच्यात काय चर्चा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध होते. मोदी आणि ओबामा आठवेळा एकमेकांना भेटले होते. याशिवाय, मोदी ओबामांच्या काळात तीनवेळा अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तर २०१५मध्ये बराक ओबामाही भारत दौऱ्यावर आले होते. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या नव्या नेतृत्त्वाशी तितक्याच चांगल्याप्रकारे संबंध प्रस्थापित करू शकतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न दोन्ही नेते करतील अशी चर्चा आहे. दक्षिण आशिया चर्चेच्या केंद्रस्थानी असेल असे सूत्रांकडून समजते. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला असून अणूपुरवठादार गटात प्रवेश मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहे. या सर्व विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारत हा संरक्षण क्षेत्रात अमेरिकेचा जवळचा साथीदार असेल असे विधान केले होते. त्यामुळे या दौऱ्यात भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.