आज भारतामध्ये सैन्य दिन साजरा केला जात आहे. दर वर्षी भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाचे वर्ष हे सैन्य दिनाचे ७१ वे वर्ष आहे.
१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे.
युद्धजन्य परिस्थिती नसतानाही हिमालयातील गोठविणाऱ्या थंडीत, थरच्या उष्ण वाळवंटामध्ये आणि ईशान्येकडील दाट जंगल परिसरामध्ये डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात.
सैन्य दिनानिमित्त सोशल मीडियावरही सैन्याच्या जवानांना सलामी दिली जात आहे. #ArmyDay हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होत आहे.
वायूसेना
युद्धाचा काळ वगळता एखादा पेचप्रसंग सोडवण्यासाठी, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी किंवा एखादी विशेष मोहिम राबवण्यात वायूदलाची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची असते. भारतीय वायूदलाच्या ताफ्यात सध्या शत्रूवर हल्ला करणारी, लढाऊ, बॉम्बहल्ला, वाहतुकीची विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टर्स अशा आयुधांचा समावेश आहे. याशिवाय, राफेलसारखी अनेक क्षमता असणारी लढाऊ विमानेही भारतीय वायूदलाच्या ताफ्यात आहेत.
नौदल
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. युद्धनौका, पाणबुड्या, आण्विक पाणबुड्या, विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, कार्वेट अशा सामरिक आयुधांनी भारतीय नौदल सुसज्ज आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७१ साली झालेल्या युद्धात भारतीय नौदलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय, हिंदी महासागर, अरबी महासागर, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीन समुद्रात भारताचे वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने नौदलाची भूमिका महत्त्वाची आहे.
भूदल
भूदल हा भारतीय लष्कराचा कणा आहे. भारतीय सीमांचे रक्षण करण्यात आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम भूदलाकडून केले जाते. गेल्या काही काळातील भूदलाची कामगिरी पाहता सध्याच्या घडीला भारतीय भूदलाची जगातील वैविध्यपूर्ण सैन्यदलात गणना होते. भूदलातील सैन्याची ३५ डिव्हिजन व १३ कॉर्प्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारतीय भूदल हे जगातील तिसरे सर्वाधिक मोठे लष्कर आहे.