Wife killed Husband : आसाममधल्या गुवाहाटी येथे राहणाऱ्या महिलेने तिच्या नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरात पाच फूट खड्डा खणून पुरला. रहिमा खातून असं या महिलेचं नाव आहे. तिने सबियाल रहमानचा म्हणजेच तिच्या पतीचा खून केला. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या दोघांच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत. या दोघांमध्ये खटके उडत होते. रहिमाने तिच्या पतीची हत्या केली.
रहिमाने पतीची हत्या कधी केली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जूनला गुवाहाटीच्या ज्योमती नगर भागातल्या पांडू परिसरात ही घटना घडली. त्यानंतर रहिमाने तिच्या नवऱ्याचा मृतदेह पाच फूट घरातच खड्डा करुन पुरला. नवरा बेपत्ता झाला आहे तो कुठे गेला हा प्रश्न विचारला जाईल हे रहिमाला माहीत होतं. त्यावेळी रहिमाने तिचा पती केरळला गेला आहे असा बनाव रचला. मात्र ती बरेच दिवस लोकांना एवढंच सांगत होती की पती रहमान केरळला गेला आहे. नंतर काही दिवसांनी तिने तिचं घर सोडलं आणि रुग्णालयात जाते आहे असं सांगून ती घरातून निघून गेली होती. त्यामुळे रहिमा खातूनवरचा संशय वाढला. त्यानंतर रहमानच्या भावाने १२ जुलै रोजी रहमान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. ज्यानंतर तपासाची सगळी चक्रं हलली आणि घटना उघडकीस आली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. १३ जुलैला रहिमा खातून पतीच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांसमोर हजर झाली. तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्येची आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली.
पोलीस उपाधीक्षक पद्मनाव बरुआंनी काय सांगितलं?
पोलीस उपाधीक्षक पद्मनाव बरुआ म्हणाले, पोलीस ठाण्यात रहिमा आली आणि तिने सांगितलं की २६ जूनला दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर मृतदेह घरातच पुरला होता. रहिमाने तिच्या पतीला जी मारहाण केली त्यात त्याला बऱ्याच जखमा झाल्या होत्या. तो गतप्राण झाल्याचं लक्षात आल्याने रहिमा घाबरली. त्यानंतर तिने घरात पाच फुटांचा खड्डा खणला आणि त्यात रहमानचा मृतदेह पुरला आणि तो केरळला गेला आहे याचा बनाव रचला.
रहिमा घाबरली आणि तिने गुन्हा कबूल केला
पोलिसांनी जी चौकशी केली त्यावेळी रहिमा घाबरली. त्यानंतर तिने खड्डा खणून मृतदेह पुरल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यानंतर तिला घरी नेलं. फॉरेन्सिक टीमला घेऊन पोलीस गेले होते. तो खड्डा पुन्हा खणण्यात आला, तिच्या पतीचा मृतदेह सापडला. पोलिसांचं म्हणणं आहे की एकट्या महिलेने खड्डा खणून मृतदेह पुरणं शक्य नाही. या प्रकरणात आणखी कुणी गुंतलं आहे का? याचाही शोध पोलिसांनी सुरु केला आहे.