प्रो-कबड्डीमुळे प्रकाशझोतात आलेला कबड्डीपटू रोहित कुमार याची पत्नी ललिता हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच रोहित कुमार आणि ललिता यांचा विवाह झाला होता. दिल्लीतील नानग्लोई परिसरात राहणारी ललिता मंगळवारी घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली असून पोलिसांकडून या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर ललिताचेच आहे का, याचा तपास सुरू आहे.
रोहित कुमार राष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षे कबड्डी खेळत असला तरी प्रो-कबड्डी स्पर्धेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात रोहित कुमार पाटणा पायरेट्स संघाकडून खेळला होता. वैशिष्ट्यपूर्ण चढायांच्या जोरावर तो अल्पावधीतच कबड्डी रसिकांमध्ये लोकप्रिय झाला होता. रोहित कुमार मूळचा हरियाणाचा असून २००९ साली स्पोर्टस कोट्यातून त्याला नौदलात नोकरी मिळाली होती.