आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यास राज्यातील मुलींना मोफत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येतील, असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. “काल मी काही मुलींना भेटले. त्यांनी सांगितले की त्यांना शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी स्मार्टफोनची गरज आहे. आज घोषणा समितीच्या संमतीने उत्तर प्रदेश काँग्रेसने ठरवले आहे की जर राज्यात पक्षाचे सरकार स्थापन झाले तर १० पास झालेल्या मुलींना स्मार्टफोन दिले जातील आणि पदवीधर मुलींना इलेक्ट्रिक स्कूटी दिल्या जातील,” असं त्या म्हणाल्या.

प्रियंका यांनी ट्विटमध्ये काही विद्यार्थिनींचा एका पत्रकाराशी बोलतानाचा व्हिडिओ देखील टॅग केला आहे. ज्यात मुली प्रियंका गांधींसोबत फोटो काढत आहेत. एका मुलीने सांगितलं की, प्रियंका यांनी आम्हाला सेल्फी घ्यायचा आहे का? असं विचारलं. तेव्हा तुमच्याकडे फोन आहे की अशी विचारणा केली. यावर, आम्ही सांगितले की आमच्याकडे फोन नाही आणि कॉलेजमध्ये फोन आणण्याची परवानगी नाही. यावर प्रियंका म्हणाल्या की आपण मुलींना फोन मिळावेत अशी घोषणा आम्ही करावी का?, तर मुली म्हणाल्या यापेक्षा चांगले काय असू शकते.

दोन दिवसांपूर्वीच प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतील अशी घोषणा केली होती.