लोकसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाची (राजद) काँग्रेसबरोबर आघाडी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आता पुस्तक लिहिण्याचा मानस व्यक्त केला आहे. आपला राजकीय जीवनप्रवासाबरोबरच कोटय़वधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात आपल्याला कोणी गोवले त्यांचे पितळ या पुस्तकातून उघडे पाडण्याचे त्यांनी ठरविले आहे.
भारतीय राजकारणाचे कधीही न उघडलेले पान आपण पुस्तकाद्वारे उलगडणार असल्याचे लालूप्रसाद यांनी ट्विट केले आहे. रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात असतानाच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.
लालूप्रसाद यांनी पुस्तक लिहिण्याचा मानस व्यक्त केल्याबद्दल प्रतिक्रिया देताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, पुस्तकात तुमच्या आणि माझ्याबद्दल काही नसेल, अशी अपेक्षा करतो.
विद्यार्थिदशेपासूनचा आपला राजकीय प्रवास आणि १९७४ मधील जयप्रकाश यांचे आंदोलन या संदर्भातील रंजक गोष्टींचा पुस्तकात समावेश असेल, असे लालूप्रसाद यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले.
चारा घोटाळ्यात आपल्याला कोणी गोवले त्याची माहितीही पुस्तकात असेल असे सांगणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि जद(यू)च्या नेत्यांवर या संदर्भात सातत्याने टीका केली आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकांनंतर लेखनाला सुरुवात करणार  आहेत.