भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी त्याला मानवंदना देऊ नये, असा फतवा पाकिस्तान तालिबानने काढल्याचे विपर्यस्त वृत्त प्रवक्त्याच्या हवाल्याने दिल्याबद्दल पाकिस्तान तालिबानने पत्रकार आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या संघटनांना लक्ष्य करण्याचे ठरविले आहे.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हक यांच्याबद्दल प्रवक्ता शहीदुल्लाह शहीद याचे विपर्यस्त वक्तव्य प्रकाशित करणारे पत्रकार आणि संघटना यांच्यावर हल्ले करण्याचे तेहरिक-ए-तालिबाना पाकिस्तानच्या शुरा कौन्सिलने ठरविले आहे.
शहीदुल्लाह शहीद यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तालिबानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पत्रकार आणि संघटनांना लक्ष्य करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे एका वृत्तपत्राने अज्ञात तालिबानी नेत्याचा हवाला देऊन म्हटले आहे.
तालिबान प्रवक्त्याच्या वक्तव्याचा विपर्यास कोणी केला, त्या पत्रकार आणि संघटनेची माहिती काढण्याचे काम तालिबानमधील एका निवडक गटाकडे सोपविण्यात आले आहे. सोशल मीडियावरून एक व्हिडीओ फीत प्रसारित करण्यात आली. त्यामध्ये तालिबानचा प्रवक्ता तेंडुलकरच्या निवृत्तीच्या वृत्तावरून पाकिस्तानी प्रसिद्धीमाध्यमांवर टीका करीत असल्याचे स्पष्ट दिसत होते.
ठार झालेल्या दहशतवाद्यांचा शहीद म्हणून उल्लेख करण्यास ज्यांचा विरोध आहे, तेच लोक तेंडुलकर हा भारतीय असल्याने त्याची स्तुती करण्यास विरोध करीत असल्याचे वक्तव्य प्रवक्त्याने केले होते, असे पूर्ण फीत पाहिल्यावरून लक्षात येते. तरीही काही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तेंडुलकरला मानवंदना देऊ नये असा फतवा तालिबान्यांनी काढल्याचे वृत्त दिले आहे.