उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बाराबांकी येथील एका अकरावीच्या विद्यार्थ्यीनीने शाळेतील कार्यक्रमात एका मान्यवर पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे हा पोलीस अधिकारी क्षणभर निशब्द झाला. “जर छोडछाड करणाऱ्याविरोधात आम्ही तक्रार केली तर आम्हाला न्याय मिळेल का?” असा प्रश्न या विद्यार्थीनीने विचारला होता.
उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या कुटुंबातील लोकांचे झालेले मृत्यू यामुळे देश हादरुन गेला आहे. या पार्श्वभूमीवर बाराबांकीच्या आनंद भवन शाळेतील मुनीबा किदवई या अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने केलेला हा सवाल पोलीस व्यवस्थेला बोचणारा होता. आनंद भवन शाळेत विद्यार्थीनींसाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून ‘बालिका जागरुकता कार्यक्रमा’चे आयोजन केले होते. यावेळी छेडछाडीच्या तक्रारींसाठी पोलिसांनी एक हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केला.
उन्नाव की रेप पीड़िता के साथ जो हुआ, उससे यूपी की लड़कियाँ कितनी डरी हुई है.इस वीडियो से समझिए.बाराबंकी के स्कूल में पुलिस जागरूकता के लिए गई तो एक लड़की बोली-यहाँ तो एक लड़की की शिकायत पर उसका रेप हुआ, परिवार को एक्सीडेंट के बहाने मार दिया गया @ABPNews @Uppolice pic.twitter.com/xigpUbs63T
— Pankaj Jha (@pankajjha_) July 31, 2019
मुनीबा पोलीस अधिकाऱ्याला सवाल करताना म्हणाली, “तुम्ही म्हणता तसं न घाबरता जर आम्ही आवाज उठवला तर, काही दिवसांपूर्वी ज्याप्रमाणे भाजपा नेत्याने एका मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिच्या वडिलांना मृत्यू घडवून आणला आणि नंतर पीडित मुलीच्या कारला ट्रकने ठोकरण्यात आले यात तिच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे जर छेडछाड करणारा शक्तीशाली व्यक्ती असेल तर आम्ही काय कराव? विरोध केल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल का? मी सुरक्षित राहिल याची खात्री काय?” असे अनेक सवाल केले. यावर काही क्षण स्तब्ध झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने उत्तर दिले की, तुम्ही आवाज उठवल्याने मुली अधिक जागरुक होतील अनेक जण हिंमतीने आवाज उठवण्यास प्रवृत्त होती.
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपाचा आमदार कुलदीपसिंह सेनगर हा प्रमुख आरोपी आहे. तसेच त्याच्यासोबत योगी सरकारमधील मंत्री रणवेंद्र प्रताप सिंह यांचा जावई अरुण सिंह हा सहआरोपी आहे. अरुण सिंह हा नवाबजंगचा ब्लॉक प्रमुख आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांवरही संशय असल्याने सीबीआयने चौकशीची सुत्रे हाती घेतली आहेत. यामध्ये १० मुख्य आरोपी आणि २० अज्ञात आरोपींविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयची १२ सदस्यीय पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे.