चिनी कंपनी बाईटडान्सची मालकी असलेल्या ‘टिकटॉक’ या प्रसिद्ध व्हिडिओ शेअरिंग अॅपची भागीदारी मायस्क्रोसॉफ्ट विकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मायक्रोसॉफ्टने स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान, अमेरिकेत टिकटॉकच्या कार्यात्मकतेची भागीदारी विकणे किंवा हे अॅप बंद करण्याची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर आला आहे. त्यामुळे अमेरिकेत आता टिकटॉक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

अमेरिका आणि चीन या दोन देशांदरम्यान टिकटॉक एक धोरणात्मक वादाचे केंद्र बनले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना टिकटॉक वापरणे थांबवण्यासाठी एक कालमर्यादा दिली आहे. यामागे टिकटॉकने आपले हक्क एका अमेरिकन कंपनीला विकावेत, हे प्रमुख कारण आहे. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेवरुन हा मुद्दा समोर आला आहे. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, “टिकटॉकचा उपयोग चीनद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लोकेशन ट्रॅक करणे, ब्लॅकमेलिंगसाठी लोकांवर डोजियर बनवणे आणि कॉर्पोरेट टेहळणी करण्यासाठी केला जाऊ शकतो.” ट्रम्प यांच्याकडून बाइटडान्स कंपनीला टिकटॉकचे कार्यात्मकता (ऑपरेशन्स) अमेरिकेत सुरु ठेवण्यासाठी त्याची भागीदारी अमेरिकन कंपनीला विकण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

टिकटॉकच्या मालकाचा उल्लेख करताना मायक्रोसॉफ्टनं एका निवेदनात म्हटलंय की, “बाइटडान्सने आज आम्हाला सांगितलं की ते अमेरिकेत टिकटॉक सुरु ठेवण्यासाठी ते मायक्रोसॉफ्टला विकणार नाही. मात्र, आम्हाला खात्री आहे की, राष्ट्रसुरक्षेसाठी आमचा प्रस्ताव टिटॉकच्या युजर्ससाठी चांगला असेल.”

टिकटॉकच्या मालकीसाठी ‘या’ अमेरिकन कंपन्या स्पर्धेत

ट्रम्प यांच्या आदेशानंतर टिकटॉकची मालकी घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल या कंपन्या स्पर्धेत होत्या. मायक्रोसॉफ्टने म्हटलं होतं की, “जर टिकटॉकची मालकी आपल्याकडे आली तर सुरक्षा, गोपनियता, ऑनलाइन सुरक्षा यासाठी आम्ही आवश्यक पावलं उचलून यासाठी उच्च मानक पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण बदल करु.”

टिकटॉकचा अमेरिकी सरकारविरोधात खटला

दरम्यान, टिकटॉकने अमेरिकी सरकारच्या या कारवाईला आव्हान देण्यासाठी कोर्टात खटला दाखल केला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, ट्रम्प यांचा आदेश आंतरराष्ट्रीय आपत्कालिन आर्थिक शक्ती अधिनियमाचा दुरुपयोग आहे. कारण हे व्यासपीठ देशासाठी धोकादायक नाही.”

टिकटॉकवर आरोप

अमेरिकेत टिकटॉक हे व्हिडिओ शेअरिंग अॅप १७.५ कोटी लोकांनी डाउनलोड केलं आहे. जगभरात हे अॅप एक अब्ज लोक वापरत आहेत. सुरुवातीपासूनच चीनकडून या अॅपद्वारे युजर्सचा डेटा गोळा केल्याचा आरोप होत आला आहे. मात्र, कंपनीने नेहमीच या आरोपांचे खंडन केले आहे.