Crime News पतीच्या हत्या प्रकरणात त्याच्या पत्नीला आणि नववीत शिकणाऱ्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात या महिलेच्या दोन मुलांचाही समावेश आहे. पतीचा मृत्यू स्ट्रोक आल्याने झाला असं या महिलेने भासवलं होतं. या प्रकरणात तिला मुलांनी साथ दिली. त्यामुळे या हत्या प्रकरणात महिलेसह तिच्या मुलीला आणि मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. आसाममध्ये ही घटना घडली.
नेमकी घटना काय घडली?
उत्तम गोगोई नावाचा एक मध्यमवयीन गृहस्थ आसामच्या दिब्रुगढ या ठिकाणी त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. ही घटना २५ जुलैला घडली. हा मृत्यू कसा झाला याचं कारण सुरुवातीला कळलं नाही. उत्तमची पत्नी बॉबी गोगोई आणि तिच्या मुलीने हे सांगितलं की उत्तम यांना स्ट्रोक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र उत्तमच्या भावाने हा आरोप केला आहे की मी जेव्हा उत्तमच्या घरी गेलो तेव्हा पाहिलं की त्याचा कान कापण्यात आला होता. तसंच मी त्या ठिकाणी एक छत्रीही उघडून ठेवलेली पाहिली. मला हे सांगण्यात आलं की घरात चोरी झाली आहे. जर माझा भाऊ उत्तम स्ट्रोकने गेला तर मग त्याचा कान कसा काय कापण्यात आला होता? असा प्रश्न उत्तमच्या भावाने उपस्थित केला. ज्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
उत्तमच्या भावाने पोलिसात केली तक्रार
उत्तम गोगोईच्या भावाने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी उत्तम गोगोईच्या पत्नीला आणि मुलीसह दोन मुलांना अटक केली आहे. उत्तम गोगोईच्या हत्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांनी दोरीने गळा आवळून उत्तमची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी उत्तमच्या पत्नीने गुन्हा कबूल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी जेव्हा बॉबीची कसून चौकशी केली तेव्हा तिने गुन्हा कबूल केला अशी माहिती पोलिसांनी दिली. उत्तमचा कान का कापला होता याची माहितीही पोलीस घेत आहेत.