वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की २१ वर्षांचा आहे तर महिलेचे वय ३३ आहे.
महिलेनेच तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. सोमवारी रात्री दारु पित असताना महिलेने कुठलेही कारण नसताना माझ्या कानाखाली मारली. मी सुद्धा तिच्या कानशिलात लगावली. त्याचवेळी महिलेने माझ्या दिशेने दारुने भरलेले ग्लास फेकून मारले असे मानने पोलिसांना सांगितले. दरम्यान दोघांमध्ये हाणामारी सुरु झाल्यानंतर मानने गळा आवळून तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली.
वर्षभरापूर्वी दोघांची सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अलीपूर पोलिसांना फोन आला. ओयो फ्लॅगशिप हॉटेलमध्ये एक महिला बेशुद्धावस्थेत पडलेली असून तिच्या नाका-तोंडातून रक्त येत आहे असे पोलिसांना सांगण्यात आले. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिलेला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले अशी माहिती उत्तर दिल्लीचे पोलीस उपायुक्त गौरव शर्मा यांनी दिली.
हॉटेल स्टाफकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या नावाने ऑनलाइन रुम बुक करण्यात आली होती. सोमवारी रात्री ती मित्रासमवेत आली होती. अलीपूर जवळील खेरा कालनमध्ये महिला राहते. तिच्या नातेवाईकांना मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मागच्या पाच महिन्यात महिला आणि आरोपी विक्की मान सहा ते सात वेळा या हॉटेलमध्ये आले होते अशी माहिती हॉटेल स्टाफने दिली.
