Woman Death : मर्चंट नेव्ही ऑफिसर अनुराग सिंह आणि मधु या दोघांचा विवाह पाच महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र मधुला रोज मारहाण केली जात होती आणि तिचा छळ केला जात होता. हे सगळं सहन न झाल्याने मधुने अखेर गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातल्या लखनऊ या ठिकाणी झाली आहे. मधुच्या कुटुंबाने ही आत्महत्या नाही तर आमच्या मुलीची हत्या आहे आणि अनुरागने या प्रकरणातले पुरावे नष्ट केले आहेत असा आरोप केला आहे. पोलिसांनी अनुरागला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु केली आहे.

मधुच्या बहिणीचा आरोप काय?

मधुची बहीण प्रियाने हा आरोप केला आहे की मर्चंट नेव्हीत अधिकारी असणारा अनुराग हा मधुच्याबाबत विकृत गोष्टी करायचा. छोट्या छोट्या गोष्टींवरुन अनुराग मधुला मारहाण करायचा. तिला जबरदस्तीने दारु पाजण्याचा प्रयत्नही करत असे. मधुला त्याने आमच्यापैकी कुणाशीही संपर्क ठेवू दिला नाही. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. मधु आणि अनुराग यांचं लग्न २५ फेब्रुवारी २०२५ या दिवशी झालं होतं. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी तिला मारहाण सुरु झाली आणि तिचा मानसिक तसंच शारीरिक छळ सुरु झाला असंही प्रियाने सांगितलं आहे. तसंच या मारहाणीमुळे मधुचा गर्भपात झाला असाही आरोप तिने केला. मधुच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरुन मधु आणि अनुराग यांचं लग्न जमलं होतं. अनुरागने हुंडा म्हणून १५ लाख रुपये आणि इतर वस्तू मागितल्या होत्या. त्याच्या सगळ्या मागण्या मधुच्या वडिलांनी पूर्ण केल्या. मात्र लग्नानंतरही त्याच्या मागण्या सुरुच होत्या आणि त्यावरुन मधुला टोमणे मारले जात होते.

Madhu Sing Death
पाच महिन्यांपूर्वी मधु आणि अनुराग यांचा विवाह झाला होता. (फोटो-मधु सिंग इन्स्टाग्राम पेज)

मधुच्या आत्महत्येच्या आधी काय घडलं?

रविवारी रात्री (३ ऑगस्ट) मधु आणि अनुराग या दोघांचं भांडण झालं होतं. रात्री १०.३० च्या सुमारास हे दोघं बाहेरुन घरी परतत येत असतानाच त्यांचं भांडण सुरु होतं. अनुरागच्या इमारतीत गार्ड म्हणून का करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने ही माहिती दिली. अनुरागने मधुने गळफास घेऊन आयुष्य संपवलं ही माहिती पोलिसांना १२ वाजता दिली. मात्र मधुच्या कुटुंबाला घटनेनंतर पाच तासांनी याबाबत कळवलं. अनुरागने आधी इमारतीच्या गार्डला सांगितलं की मधुने आत्महत्या केली. त्यानंतर स्वतःच मधुचा लटकत असलेला मृतदेह खाली उतरवला. मधुच्या घरातल्या सदस्यांनी सांगितलं की ३ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या घरी स्वयंपाकाला येणाऱ्या बाईला अनुरागने येऊ नकोस असं सांगितलं होतं. रात्री १०.३० च्या दरम्यान ऑनलाइन जेवण मागवलं होतं. त्यामुळे अनुरागने ठरवून मधुला ठार केलं असावं असा संशय तिच्या कुटुंबाला आहे.

मधुने तिच्या बहिणीला काय सांगितलं होतं?

मधुने तिची बहीण प्रियाला हे सांगितलं होतं की अनुराग त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला घेऊन घरी येतो. अनुराग त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला एका हॉटेलवरही भेटला होता. यावरुन जेव्हा मधुने त्याला विचारणा केली तेव्हाही दोघांमध्ये भांडण झालं. अनुराग आपल्याला विवस्त्र करुन मारहाण करतो असंही तिने सांगितलं होतं असंही प्रियाने सांगितलं. मधुच्या कुटुंबाचं हे म्हणणं आहे की मधु ही लग्नाच्या आधी एक स्वच्छंदी आणि आयुष्य मोकळेपणाने जगणारी मुलगी होती. पण लग्नानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. अनुराग तिच्याशी कुठल्याही गोष्टीवरुन भांडत असे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनुरागने आपण काहीही केलेलं नाही असं म्हटलं आहे. तसंच मधुने आत्महत्या का केली? याचं कुठलंही कारण त्याला सांगता आलेलं नाही. पोलीस ठाण्यात अनुराग सिगारेट मागत होता. त्याच्या या वागणुकीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.