हुंडा, कौटुंबिक हिंसाचार अशा त्रासांना कंटाळून अनेक विवाहित महिला आपलं आयुष्य संपवतात. असाच प्रकार आता केरळमधून समोर आलाय. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात १४ जानेवारीला सकाळी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी शहाना मुमताज तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या पती आणि सासरच्या मंडळींकडून तिचा रंग आणि इंग्रजी भाषेवरून तिचा छळ केला गेला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. यातूनच तिच्या सासरच्यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बीएससी गणिताच्या प्रथम वर्षाची विद्यार्थीनी असलेल्या शहानाने गेल्या वर्षी मे महिन्यात अब्दुल वहाब या अबू धाबी येथे कामाला असलेल्या मुलाशी लग्न केले. तो आबुधाबीला परत जाण्यापूर्वी हे दोघे २२ दिवस एकत्र राहिले होते. तो त्याच्या कामावर परतल्यानंतर त्याने शहानाबरोबर बोलण्यास टाळाटाळ केले. तो तिचा फोन उचलत नसे, तर मेसेजद्वारे तिचा छळ केला गेला, असा आरोप शहानाचे काका अब्दुल सलाम यांनी केला. एवढंच नव्हे तर तिच्या दिसण्यावर आणि इंग्रजी भाषेच्या कौशल्यावरून तिचा नवरा तिचा छळ करत होता, असाही आरोप करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सासूला विनंती, पण तिनेही नाही ऐकलं

याप्रकरणी नवऱ्याची समजूत काढण्याची विनंती तिने तिच्या सासरच्यांकडे केली. पण तिची विनंती तिच्या सासू-सासऱ्यांनी फेटाळून लावली. आपल्या मुलाला तुझ्यापेक्षा जास्त हुशार आणि सुंदर मिळायला हवी होती, असंही तिची सासू म्हणत असे. शहाना १४ जानेवारी रोजी तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. कोंडोट्टी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि तिच्या मृत्यूच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास करत आहेत. शहानावर १५ जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास सुरू असून, कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांवर पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.