रविवारचा दिवस बलात्कारांच्या घटनांनी सर्वांना सुन्न करणारा ठरला. ‘निर्भया’ प्रकरणाची आठवण करून देणारी एक घृणास्पद घटना हरियाणामध्ये घडली. त्याचप्रमाणे आता दिल्लीजवळच्या गुरूग्राममध्येही (गुरगाव) एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.
या घटनेतील पीडित तरूणी ईशान्य भारतातली असून ती कनाॅट प्लेसवरून सेक्टर १७ मधल्या तिच्या घरी जात होती त्यावेळी तिला काही माणसांनी एका गाडीत ओढून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला दिल्लीच्या नजफगढ भागात गाडीतून बाहेर ढकलण्यात आलं. तिघा पुरूषांनी तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. या तिघांपैकी एका माणसाचं नाव दीपक असल्याचं या तरूणीने सांगितलं.
रविवारी घडलेल्या दुसऱ्या बलात्काराच्या घटनेत नृशंसतेचा कळस गाठला गेला. यामध्ये आरोपींनी तरूणीवर बलात्कार करून तिचा खून करत तिची ओळख कोणाला पटू नये म्हणून तिच्या मृतदेहाच्या डोक्याचे दगडाच्या साहाय्याने तुकडे करून तिचा मृतदेह निर्जन स्थळी फेकला.
आपल्या देशात आणि विशेषत: दिल्लीमध्ये बलात्कार ही एक फार मोठी समस्या असून डिसेंबर २०१६ च्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर सरकारने अनेक कायदे आणि मोहिमा राबवूनही अशा घटना सारख्या सारख्या घडत असल्याचं दिसून येत आहे.
मुळात स्त्रीला भोगवस्तू समजण्याच्या समाजाच्या मानसिकतेशी या सगळ्याचा संबंध आहे. जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही. कितीही कायदे केले किंवा कितीही नियम लागू करत मोहिमा चालवल्या तरी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचं मूळ आपल्या सगळ्यांच्या मनातच आहे.