उत्तर प्रदेशमधील रामपूर आणि गोंडा जिल्ह्यातून तिहेरी तलाकच्या दोन घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गोंडा जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या दिव्यांग मुलीच्या उपचारासाठी पतीला पैसे मागितले पण त्याने पैसे देण्याऐवजी फोनवरूनच तिहेरी तलाक दिला. तर दुसरीकडे रामपूर जिल्ह्यात एका पतीने पत्नी दिसायला सावळी असल्याचे कारण देत तिहेरी तलाक दिला. केंद्र सरकारकडून तिहेरी तलाकविरोधात कायदा तयार केला जात असतानाच ही दोन प्रकरणे समोर आली आहेत.

तिहेरी तलाक पीडित महिला आता न्यायासाठी दारोदारी भटकत आहेत. रामपूर जिल्ह्यातील तिहेरी तलाकची बळी अमरिन म्हणाली की, तिचा पती आणि कुटुंबीय सावळा रंग आणि कमी हुंडा मिळाल्याने नाखूश होते. त्यामुळेच त्यांनी मला तिहेरी तलाक दिला. सासरकडील मंडळींनी आपल्याला जाळून मारण्याची धमकी दिली होती, असा दावाही अमरिन यांनी केला होता. यामुळेच आपण घर सोडून पळाल्याचे त्यांनी म्हटले.

माझे पती माझ्या सावळ्या रंगावर खूश नव्हते. ते आणि त्यांचे कुटुंबीय नेहमी मला धमकावत. ते मला जेवायलाही देत नसत. ते वारंवार मला पेटवून देण्याची धमकी देत. मी त्यांच्या लायक नसल्याचे पती नेहमी म्हणत. त्यांचे कुटुंबीय हुंड्याच्या रकमेवरूनही खूश नव्हते, असे अमरिन यांनी म्हटले.

जिल्हा पोलिसांनीही या घटनेची पुष्टी दिली असून त्यांनी संशयित आरोपी पतीसहित पाच जणांविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे. तिहेरी तलाकची दुसरी घटना ही गोंडामध्ये पत्नीने दिव्यांग मुलीच्या उपचारासाठी पैसे मागितल्याने पतीने तिहेरी तलाक दिला.

पीडित शकिना बानोचे १७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना १४ वर्षांची दिव्यांग मुलगी देखील आहे. पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितले की, शकिनाचा पती मुंबईत काम करतो आणि गावाकडे क्वचितच येतो. लग्नाच्या तीन वर्षांनंतर शकिनाचा पती नोकरीसाठी मुंबईला गेला होता. माझ्या मुलीने आता उपचारासाठी पैसे मागितले तर त्याने तिहेरी तलाक दिला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला अवैध घोषित केल्यानंतरही उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारला तिहेरी तलाकविरोधात कायदा करायचा आहे. तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत संमत झाला असून राज्यसभेत ते अजूनही प्रलंबित आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात हुंड्यात म्हैस आणि मोटारसायकल न मिळाल्यामुळे एका महिलेला तिच्या पतीने तिहेरी तलाक दिला होता.