Crime News : एका महिलेला प्रेशर कुकरने मारहाण करुन त्यानंतर गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली. चाकू आणि कात्रीने तिचा गळा चिरण्यात आला. यानंतर हल्लेखोरांनी अंघोळ केली आणि घर साफ करत पोबारा केला अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. हैदराबादमधल्या या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. हे दोन हल्लेखोर होते असंही पोलिसांनी सांगितलं.

नेमकी घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणु अग्रवाल ही ५० वर्षांची महिला स्वान लेक अपार्टमेंट हैदराबाद या ठिकाणी १३ व्या मजल्यावर तिच्या पतीसह आणि मुलासह राहात होती. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास मिस्टर अग्रवाल आणि त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेले. हे दोघंही स्टिल व्यवसायात आहेत. संध्याकाळी ५ च्या सुमारास मिस्टर अग्रवाल आणि त्यांचा मुलगा या दोघांनी रेणु अग्रवाल यांना पाच वेळा फोन केला पण त्यांनी मोबाइल उचलला नाही. रेणु अग्रवाल कधीही असं करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पतीला काळजी वाटली. ते तातडीने घरी परतले. त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांना धक्काच बसला.

रेणु अग्रवाल यांच्या पतीने काय सांगितलं?

रेणु अग्रवाल यांचे पती म्हणाले मी घरी पोहचलो तेव्हा पाहिलं की माझ्या पत्नीला म्हणजेच रेणुला हातावर आणि पायावर कुकरने मारहाण करण्यात आली आहे. तसंच तिचा गळा कात्री आणि चाकूने चिरण्यात आला आहे. हल्लेखोरांनी चार तोळ्यांचं सोनं आणि घरात असलेली एक लाखांची रोख रक्कम लूटून पोबारा केला. माझ्या पत्नीची हत्या केल्यानंतर त्यांनी बाथरुममध्ये अंघोळ केली. कपडे बदलले आणि मग इथून पळ काढला. त्यांचे रक्ताने डागाळलेले कपडेही इथेच टाकले होते.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला. घरकाम करणाऱ्या दोघांनीच रेणु अग्रवाल यांच्यावर हल्ला केला असा अंदाज पोलिसांना आहे. शेजारच्या घरात घरकाम करणारे हे दोघे होते. त्यांनी रेणु यांच्या घरावर पाळत ठेवली होती. हे दोघंही सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. १३ व्या मजल्यावरचं जे फुटेज समोर आलं आहे त्यात संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हर्षा आणि रोहन हे दोन घरकामासाठी मदत करणारे दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत. हे दोघंही शेजारच्या घरात काम करत होते. मागील दहा दिवसांपूर्वी त्यांना नेमण्यात आलं होतं. अशी माहिती पोलिसांनी दिली.