तामिळनाडूत १५ जणांनी मिळून एका महिलेचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री महिलेच्या घरातूनच तिचं अपहरण करण्यात आलं. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून, महिलेची सुटका केली आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडीओत १५ जण घराचा गेट तोडून घऱामध्ये घुसत असल्याचं दिसत आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विग्नेश्वरण याने महिलेशी मैत्री केली होती आणि सतत तिच्यावर पाळत ठेवत होता. महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी विग्नेश्वरणला समज दिली होती. तसंच त्याच्याकडून लेखी जबाब घेत सुटका केली होती.

१२ जुलैला विग्नेश्वरण याने महिलेचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने सुटका करुन घेत पोलीस स्टेशन गाठलं होतं. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. यादरम्यान, मंगळवारी रात्री विग्नेश्वरण आणि त्याचे १४ सहकारी महिलेच्या घरात घुसले आणि तिचं अपहरण केलं. यावेळी त्यांनी महिलेच्या कुटुंबाला धारदार शस्त्रांच्या सहाय्याने धमकावलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एक शोध पथक तयार केलं. आरोपींची कार राष्ट्रीय महामार्गावर असल्याचं कळताच पोलीस पोहोचले आणि विग्नेश्वरणसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.