पती-पत्नीची विकोपाला गेलेली अनेक भांडणं आपण पाहिली आहेत. या भांडणातून बऱ्याचदा खूनाच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना तमिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये घडली आहे. सततच्या भांडणाला कंटाळून येथील एका महिलेने पतीच्या अंगावर उकळतं तेल ओतून त्याचा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही घटना २७ ऑगस्टची आहे. महिलेने तिच्या पतीच्या अंगावर उकळतं तेल ओतलं होतं. उकळतं तेल अंगावर ओतल्यामुळे होरपळलेल्या व्यक्तीला दिंडीगुलमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, शनिवारी रात्री (२ सप्टेंबर) त्याचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
चेल्लामुथू (६३) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो दिंडीगुलमधल्या ओड्डानचतिराम तालुक्यातील रहिवासी होतो. येथेच तो शेतीचं काम करत होता. त्याची पत्नी पोन्नाथल हिने त्याच्या अंगावर तेल ओतून त्याचा खून केला आहे. या जोडप्याल दोन मुलं आहेत.
चेल्लामुथू हा दारूच्या आहारी गेला होता. तो नेहमी दारू पिऊन पत्नी पोन्नाथल हिच्याशी भांडायचा. या भांडणांना कंटाळून पोन्नथल हिने टोकाचं पाऊल उचललं.
त्या दिवशी काय घडलं होतं?
चेल्लामुथू हा २७ ऑगस्ट रोजी दारून पिऊन घरी आला होता. दारूच्या नशेत त्याने पत्नी पोन्नाथल हिच्याशी भांडण केलं. चेल्लामुथूने त्या दिवशी पोन्नाथलकडे जेवणात पुऱ्या बनवून देण्याची मागणी केली होती. परंतु, पोन्नाथलने त्यास नकार दिला. त्यामुळे दोघांचं मोठं भांडण झालं. रात्री झोपण्यापूर्वी चेल्लामुथूने पोन्नाथलला खूप मारहाण केलं. त्यामुळे रात्री पोन्नाथलने कढईत खोबरेल तेल उकळलं आणि झोपलेल्या चेल्लामुथूच्या अंगावर ओतलं.
उकळतं तेल अंगावर पडल्यानंतर चेल्लामुथू ओरडू लागला. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी चेल्लामुथूच्या घराकडे धाव घेतली. शेजारी राहणाऱ्या लोकांनी चेल्लामुथूला जखमी अवस्थेत ओड्डानचतिराम येथील सरकारी रुग्णालयात नेलं. परंतु, चेल्लामुथूची परिस्थिती खूपच गंभीर होती. त्यामुळे ओड्डानचतिराम रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला दिंडीगुल शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितलं. त्यानुसार लोकांनी चेल्लामुथूला दिंडीगुलला नेलं. तिथे गेल्या काही दिवसांपासून चेल्लामुथूवर उपचार सुरू होते. परंतु, शनिवारी रात्री उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा >> “…तेव्हा पाठीवरचे लाठ्यांचे वळ विसरु नका”, राज ठाकरेंचं मराठा आंदोलकांना आवाहन
पोलिसांनी याप्रकरणी आधी गंभीर इजा केल्याप्रकरणी पोन्नाथल हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु, चेल्लामुथू यांच्या निधनानंतर पोलिसांनी पोन्नाथलविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोन्नाथलने गुन्हा कबूल केला आहे.