उत्तर प्रदेशमधील मुस्कान रस्तोगी आणि मध्य प्रदेशच्या सोनम रघुवंशी या दोन महिला आरोपींनी आपल्याच पतीची हत्या केल्याचे प्रकरण नुकतेच गाजले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील एका प्रकरणाची चर्चा आता होत आहे. बरेलीतील इज्जत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधना नामक महिलेने आपल्या पती राजीव यांना संपविण्याचा कट रचला. यासाठी तिने आपल्या पाच भावांना या कटात सामील करून घेतले. भावांनीही काही गुडांसह भावोजीला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र राजीव बचावले असून त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली.
आरोपी पत्नी साधनाने स्वतःच्या नवऱ्याला मारण्यासाठी पाचही भावांना तयार केले. भावांनी काही गुंडाच्या मदतीने भावोजींचे हात-पाय तोडले. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना जंगलात नेले. तिथे जिवंत पुरण्यासाठी खड्डाही खणला. मात्र तेवढ्यात तिथून काही लोक येत असल्याची चाहूल लागल्यामुळे मारेकरी जखमी राजीवला टाकून पळून गेले.
प्रत्यक्षदर्शींनी जखमी राजीवला पाहून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आता राजीव यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पतीला संपविण्याची योजना का आखली? त्यामागचे कारण काय होते? याबाबतची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
२१ जुलै रोजी पत्नी साधनाने राजीवची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी तिच्या भावासह इतर मारेकरी मिळून ११ जण रात्री राजीवच्या घरी गेले. तिथे त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. हातापायाला गंभीर दुखापत केल्यानंतर एका गाडीत टाकून जवळच असलेल्या जंगल परिसरात त्याला नेण्यात आले. तिथे खड्डा खणून राजीवला जिवंत पुरायचा त्यांचा मानस होता.
आता राजीव यांचे वडील नेतराम यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून आणि तिच्या भावांनी मुलगा राजीवची हत्या करण्याचा आरोप करण्यात आला असून त्यांना आरोपी केले आहे. एकूण ११ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेतराम यांनी केली आहे.
राजीव हे बरेलीच्या नवोदय रुग्णालयात डॉक्टरचे सहाय्यक म्हणून काम करतात. २००९ साली त्यांचा साधनाशी विवाह झाला. त्यांना १४ आणि ८ वर्ष वय असेलली दोन मुले आहेत. राजीव यांचे गावात स्वतःचे घर आहे. पण नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाच्या निमित्त ते शहरात भाड्याच्या घरात राहतात.