मुसळधार पावसामुळे गुडगाव शहरातील रस्त्यांवर सोमवारी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आणि याचा परिणाम म्हणून रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत अनेक लोक कित्येक तास अडकून पडले. असेच तब्बल सहा तासांहून अधिक काळ ट्रॅफिकमध्ये प्रवास करून एका महिला प्रवाशाला रॅपिडो चालकाने तिच्या घरी पोहोचवले. या रॅपिडो चालकासाठी दीपाली नारायण भारद्वाज यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. सूरज मौर्य असं या रॅपिडो चालकाचं नाव असून त्यांनी पोस्टमध्ये त्याचे आभार मानले आहेत. प्रचंड ट्रॅफिक असूनही त्याने कसलीही तक्रार न करता त्यांना सुरक्षित घरी पोहोचवले.
नेमकं झालं काय?
गुडगाव येथे सोमवारी तुफान पाऊस झाला, ज्यामुळे सर्वत्र पाणी भरले आणि संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली. दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवे पूर्णपणे बंद झाला. या रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत काही प्रवासी तर सहा तासांपेक्षा जास्त काळासाठी अडकून पडले होते. या भीषण वाहतूक कोंडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये हजारो लोक कित्येक तासांसाठी अडकले होते, ज्यामध्ये दीपिका नारायन भारद्वाज या देखील होत्या. पाणी भरलेल्या ज्या रस्त्यांवरून रॅपिडो चालकाला वाहन चालवावे लागत होते त्या रस्त्याचा भारद्वाज यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भारद्वाज यांनी सांगितलं की ड्रायव्हर त्यांना घरी घेऊन जात असताना सहा तास वाहन चालवत होता आणि त्याने एकदाही तक्रार केली नाही. अखेर जेव्हा ते घरी पोहचले, तो नम्रपणे म्हणाला की, “मॅडम, तुम्हाला वाटतील तेवढे पैसे द्या.”
भारद्वाज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या रॅपिडो चालकाचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, “हाय रॅपिडो बाईक अॅप, मला तुमचे ड्रायव्हर पार्टनर सूरड मौर्य यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. गुडगाव ट्रॅफिकमुळे ते माझ्याबरोबर ६+ तास होते, पण त्यांनी अजिबात तक्रार केली नाही,” असे भारद्वाज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “या पाण्यातून मला घरी सोडले आणि नम्रपणे म्हणाले- मॅडम, तुम्हाला वाटतील तेवढे पैसे द्या.”
या पोस्टच्या खाली अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या रॅपिडो चालकाचे तोंडभरून कौतुक केले आहे.