सुखी संसाराची स्वप्नं पाहून, त्याच्यासोबत नव्या घरात आयुष्यभर नांदण्याच्या हेतूनं ‘ती’ गोव्यातलं कोंडोलिम सोडून मुंबईला गेली. मात्र ज्याच्यासोबत आयुष्यभर संसार करायचा असं ठरवलं होतं, तो आधीच विवाहित असल्याचं तिला समजलं. प्रेमभंगाचं दु:ख घेऊन मग ती गोव्यातल्या तिच्या मूळगावी परतली. मात्र तिच्या स्वभावातल्या बदलांमुळे घरच्यांनी तिला एका खोलीत कोंडून ठेवलं. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल २० वर्षे ती एका अंधाऱ्या खोलीत राहात होती. अखेर तब्बल २० वर्षांनी तिला मोकळा श्वास घेता आला आहे.

कोंडोलिममधील घरात तब्बल २० वर्षे डांबून ठेवण्यात आलेल्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांना ही महिला नग्न अवस्थेत सापडली. एका अतिशय घाणेरड्या खोलीत महिलेला तिच्या कुटुंबीयांनी डांबून ठेवलं होतं. पोलीस ज्यावेळी या महिलेच्या सुटकेसाठी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी तिनं घराबाहेर पडण्यास नकार दिला. कारण गेल्या २० वर्षांमध्ये तिनं मोकळा श्वासच घेतला नव्हता. अखेर तब्बल २० वर्षांनंतर या महिलेनं खोलीबाहेर पाऊल ठेवलं.

संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घरासमोरील एका खोलीत महिलेला कोंडून ठेवलं होतं. खोलीला असणाऱ्या एका खिडकीतून महिलेला जेवण आणि पाणी दिलं जातं होतं. या महिलेचे दोन भाऊ त्यांच्या कुटुंबासह खोलीजवळ असणाऱ्या घरात राहतं. मात्र या महिलेला २० वर्षांमध्ये कोणीही बाहेर काढलं नाही. कोंडोलिममध्ये देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र या महिलेला स्वत:च्या घरातूनही बाहेर पडायला बंदी होती.

अखेर एका समाजसेवी संस्थेला याबद्दलची माहिती समजली. एका व्यक्तीनं खिडकीतून संबंधित महिलेला पाहिल्यावर त्यानं ईमेलच्या मदतीनं समाजसेवी संस्थेला हा प्रकार कळवला. यानंतर समाजसेवी संस्थेनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि मग पोलिसांनी महिलेची सुटका केली. सध्या पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

संबंधित महिलेला मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं. मात्र तो व्यक्ती आधीच विवाहित असल्याची माहिती समजल्यावर महिला मूळगावी परतली. त्यानंतर तिच्या स्वभावात बदल जाणवू लागल्याने तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. ‘ती महिला मुंबईतून परतल्यापासून तिच्या वागणुकीत बदल झाला होता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला एका खोलीत कोंडून ठेवलं,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केली नसून पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली आहे.