प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पारंपारिक चौकटी मोडून असाधारण यश प्राप्त केले आहे. भारतात आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत आणि देशाचा गौरव वाढवत आहेत. नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंब एकतेच्या सुत्रात बांधले आहे. देशात प्रचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जात आहे.

यावेळी पंतप्रधानांनी प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले कारण, त्यांनी महिला शक्तीचे उदाहरण देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा उल्लेख केला. येत्या १ फेब्रुवारी रोजी त्यांचा स्मृतीदिन आहे. चावला यांनी आपल्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या महिला पायलट्सचा उल्लेख केला. भारतीय हवाई दलातील या तीनही पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्यांनी सुखोई-३० लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाचा उल्लेख केला या स्थानकांत सर्व व्यवस्था महिलाच पाहतात. येथे सर्व महत्वाच्या पदांवर महिला अधिकारी आहेत. ही बाब खूपच प्रशंसनीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

छत्तीसगढच्या दंतेवाडातील महिलांचे कौतूक करताना पंतप्रधान म्हणाले, हा नक्षलग्रस्त भाग आहे. मात्र, येथील महिला ई-रिक्षा चालवतात, येथे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. यामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. तसेच इथल्या सामाजिक वातावरणातही बदलही होत आहेत. महिला सशक्तीकरणानंतर पंतप्रधानांनी पद्मश्री जाहीर झालेले अरविंद गुप्ता यांच्या कार्याची नोंद घेतली. ते म्हणाले, त्यांनी आपले सारे जीवन हे कचऱ्यातून खेळणी बनवण्यात घालवले. आम्ही अशा लोकांचा सन्मान केला जे मोठ्या शहरातील नाहीत मात्र त्यांनी देशासाठी खूपच चांगले काम केले आहे.