लग्नानंतर महिलेला पासपोर्टवर आपले जुने नाव बदलून सासरचे नाव लावण्याची यापुढे आवश्यकता राहणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. पासपोर्टसाठी महिलांना लग्नाचे किंवा घटस्फोटाची कागदपत्रे जमा करण्याचे बंधन नसेल असे मोदींनी स्पष्ट केले. सासरचे नाव लावायचे की माहेरचे नाव लावायचे याचा निर्णय महिलांनीच घ्यायचा आहे असे ते म्हणाले. त्यांना हवे असल्यास बदल केले जातील अथवा जुने नाव राहू दिले जाईल असे मोदी म्हणाले.

महिलांनी विकासाच्या केंद्रस्थानी असावे असे मोदींनी म्हटले. मुद्रा आणि उज्ज्वला या योजनांद्वारे महिलांचे सबळीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे असे त्यांनी म्हटले. यापुढे महिलांना त्यांचे नाव बदलण्याची आवश्यकता भासणार नाही असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेच्या एका कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ काँफरंसिंगद्वारे ही घोषणा केली.

केंद्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्याचे त्यांनी म्हटले. मातृत्व रजेचा काळ १२ आठवड्यांवरून वाढवून २६ आठवड्यांवर आणण्याचा निर्णय आमच्याच काळात घेण्यात आला तसेच गरीब कुटुंबियांना प्रसूतीसाठी ६,००० रुपयाचे सहकार्य देण्याचाही निर्णय आम्ही घेतल्याचे ते म्हणाले.

उज्ज्वला योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना गॅस कनेक्शन देण्याचा सरकारचा निर्धार आहे. देशातील गरीब महिलांना पाच कोटी गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. आतापर्यंत गॅसवर मिळणारे अनुदान १.२ कोटी लोकांनी स्वयंस्फूर्तीने सोडले आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यामुळे याचा फायदा निश्चितच गरीब आणि ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.

आजच्या काळातील महिला या सशक्त आहेत. त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नसल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे चिकाटी, संयम आणि धैर्य हे गुण त्यांच्यात आहेत असे ते म्हणाले. लिज्जत पापड किंवा अमूल सारख्या ब्रॅंडकडे पाहिल्यास महिलांच्या खऱ्या शक्तीचा अंदाज येतो असे ते म्हणाले.  मुद्रा लोनच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना उद्योग-व्यवसायासाठी कर्ज दिले जाईल असे ते म्हणाले. या कर्जाच्या माध्यमातून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाईल असे पंतप्रधानांनी म्हटले.