Consuction Site Worker cracks NEET: ओडिशामील खुर्दा जिल्ह्यातील मुदुलिधिया गावातील शुभम सबर हा कुटुंबाचे पोट भरण्यासाठी बंगळुरूतील एका बांधकाम साईटवर काम करायला गेला. १४ जून रोजी तो नेहमीप्रमाणे साईटवर काम करत असताना त्याला ओडिशातून त्याच्या शिक्षकाचा फोन आला. शिक्षकांनी त्याला फोनवर सांगितले की, त्याने नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आदिवासी समाजातून पुढे येऊन कसेबसे शिक्षण घेणाऱ्या शुभमसाठी हा सुखद धक्का होता. नुकतेच त्याला ओडिशातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, त्यानिमित्ताने याची पुन्हा चर्चा होत आहे.
नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजताच शुभम सबरने म्हटले की, ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. मी आई-वडिलांना सांगितले की, मी आता डॉक्टर होणार आहे. त्यानंतर मी आमच्या कंत्राटदाराला फोन करून सांगितले की, माझा हिशोब देऊन टाका मी निघायचे आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला १९ वर्षीय शुभर सबरला ओडिशाच्या बेरहमपूर मधील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला. शुभमने पहिल्याच प्रयत्नात अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून १८,२१२ वा क्रमांक मिळवला होता.
शुभम आता चार वर्षांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करेल, तेव्हा तो त्यांच्या पंचायतीमधील डॉक्टर बनणारा पहिला व्यक्ती असणार आहे. शुभमचे वडील लहान शेतकरी आहेत. चार भावंडांमध्ये तो सर्वात मोठा आहे. आर्थिक चणचणीत अतिशय खडतर आयुष्य जगणाऱ्या शुभमचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी व्यापलेला होता. याची जाणीव ठेवून आता तो वैद्यकीय शिक्षण घेण्यास सज्ज झाला आहे.
शुभमने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, मला आमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होती. माझ्या आई-वडिलांकडे अतिशय थोडी जमीन होती. त्यामुळे आम्हा भावंडांचे पोट भरण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागत होते. पण मी माझा अभ्यास सुरू ठेवला आणि आयुष्यात काही तरी करून दाखविण्याचा दृढनिश्चय केला.
दहावीला शुभमला ८४ टक्के गुण मिळाले होते. तेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला भुवनेश्वरमधील बीजेबी महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. बारावीच्या परीक्षेत त्याने ६४ टक्के गुण घेतले. या काळात त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले. बेरहमपूरमधील एका कोचिंगमध्ये त्याने नीटचे प्रशिक्षण घेतले आणि परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर तो बंगळुरूत मजुरीसाठी गेला.
बंगळुरूत मी तीन महिने काम केले. त्यातून काही पैसे मी मिळवले. यातून मी कोचिंग सेंटरची फी दिली असून उरलेले पैसे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी भरले आहेत, असेही शुभमने सांगितले.