बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेसाठी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता ही रथयात्रा उत्साहात पार पडली आणि त्यामध्ये परदेश आणि देशभरातील हजारो भाविक सहभागी झाले होते.
या रथयात्रेसाठी सात हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावधानतेचा इशाराही देण्यात आला होता. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्याच्या सूचना जनतेला देण्यात आल्या होत्या.
दहशतवादविरोधी पथक, शीघ्र कृती दलाचे अधिकारी आणि शार्प शूटर्स महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते, तर तटवर्ती क्षेत्रात तटरक्षक दलास सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला होता. सुरक्षा धोक्यात असल्याची तमा न बाळगता हजारो भाविकांनी भक्तिभावाने जगन्नाथाचा रथ ओढला.
मंदिराच्या गाभाऱ्यातून जगन्नाथ, बाळभद्र आणि भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती बाहेर आणताच हजारो भाविकांनी मंत्रोच्चाराचे पठण केले. आपल्या आवडत्या देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी या वेळी भाविकांनी मोठी झुंबड केली होती.