पीटीआय, संयुक्त राष्ट्रे

जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी भारतीय उत्पादन असलेल्या एका सिरप औषधावर उत्पादन इशारा जारी केला. हे औषध वापरण्यासाठी विशेषत: लहान मुलांसाठी असुरक्षित असून त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला.
‘ग्वायफेनेसिन सिरप टीजी’ हे औषध निकृष्ट असून मार्शल आयलंड्स आणि मायक्रोनेशिया येथे या औषधाचा वापर करण्यात आलेला आहे. या औषधाची निर्मिती पंजाबमधील क्यूपी फार्माकेम लिमिटेड या कंपनीकडून केली जाते आणि हरियाणातील ट्रिलियम फार्मा ही कंपनी या औषधाचे विपणन करते. या दोन्ही कंपन्यांनी या औषधाच्या सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत जागतिक आरोग्य संघटनेला हमी दिलेली नाही. या औषधाचा वापर केल्यास लहान मुलांना पोटदुखी, उलटय़ा, अतिसार, लघवी करताना त्रास, डोकेदुखी आणि मानसिक आरोग्यासंदर्भातील दुष्परिणाम यांना सामोरे जावे लागू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हे औषध खोकल्यासंदर्भातील असून कफ कमी करण्यासाठी वापरले जाते.

‘भारताला बदनाम करण्यासाठी..’

जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्यानंतर क्यूपी फार्माकेम लिमिटेड या कंपनीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताला बदनाम करण्यासाठी कुणी तरी या औषधाच्या नावाचा वापर करून बनावट औषधे विकत आहेत, असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाठक यांनी सांगितले. कंबोडियाला पाठवलेल्या उत्पादनाची (कफ सिरप) कोणी तरी नक्कल केली आणि नंतर ते भारत सरकारची बदनामी करण्यासाठी मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियात विकले गेले, अशी पंजाबच्या अन्न आणि औषध प्रशासनाला शंका आहे, असे पाठक म्हणाले.