धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी धोक्याचे असते हे आपल्यातील अनेकांना माहित आहे. मात्र धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आसपास वावरणेही धोक्याचे असते हे लक्षात घ्यायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. सिगारेट ओढणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग, सीओपीडी, काळा दमा होण्याचा धोका जास्त असतो. मात्र याबरोबरच धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या आसपास असणाऱ्यांनाही त्या धुराने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग असे म्हटले जाते. सिगारेट, सिगार आणि पाईप यांच्यातून येणारा धूर श्वासाद्वारे शरीरात गेला की त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जास्त काळ धुम्रपान कऱणाऱ्या लोकांमध्ये वावरत असाल तर वेळीच सावध व्हा.

ठळकपणे समोर येणारी आकडेवारी

– धुम्रपानात असणारे जवळपास ४ हजार रासायनिक पदार्थ आणि १५० टॉक्सिन्स शरीरासाठी अतिशय घातक असतात.

– २ महिने ते ५ वर्षे वयाच्या मुलांमधील ३८ टक्के मुले धुम्रपानातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येतात.

– या धुरामुळे लहान वयात दमा, डोळ्यांचे त्रास, घशाचा संसर्ग, सर्दी-खोकला होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

– धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या पत्नीमध्ये हृदयाशी निगडीत तक्रारी, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

– जगात दरवर्षी ७० लाख लोक तर भारतात दररोज २७३९ लोक धुम्रपानामुळे आपले प्राण गमावतात. यामध्ये पॅसिव्ह स्मोकिंग करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असते.

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे उद्भवणाऱ्या तक्रारी

– घसा, स्वरयंत्र, सायनसेस, मेंदू, मूत्राशय, जठर, गुदाशय, स्तन या महत्वाच्या अवयवांचे कर्करोग होतात.

– हृदय आणि रक्तवाहिन्यांवर विपरित परिणाम होऊन हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.

– पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कमालीचे मानसिक नैराश्यही येऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– लहान मुले सतत आजारी पडू लागतात. त्यांना सर्दी, खोकला, दमा, कान फुटणे असे साधे आणि दमा, ब्रॉन्कायटिस, न्युमोनियासारखे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

– सिगारेटच्या धुरामुळे या मुलांना दम्याचा अॅटॅक येऊ शकतो. या मुलांना लिम्फोमा, रक्ताचा कर्करोग, मेंदूचे ट्युमर्स तसेच यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात.

– नवजात अर्भकाचा सिगारेटच्या धुराने श्वास गुदमरून अचानक मृत्यू होऊ शकतो, याला ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ म्हणतात.