माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावरून पुन्हा एकदा अर्थमंत्री अरूण जेटलींवर निशाणा साधला आहे. अरूण जेटलींच्या जागेवर मी असतो, तर तेव्हाच राजीनामा दिला असता, असा टोला त्यांनी लगावला. जर जेटलींच्या जागेवर मी असतो तर काय केलं असतं ? मी राजीनामा दिला असता, असे ते म्हणाले. भारत चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ च्या संदर्भातील राजकोषीय एकत्रीकरण या मुद्द्यावर ते बोलत होते. जेटलींना दुसऱ्यांनी तयार केलेला अर्थसंकल्पाचे वाचन करण्यास निश्चितच अडचणींचा सामना करावा लागला असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. अर्थसंकल्पावर टीका करताना त्यांनी राजकोषीय एकत्रीकरणात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे म्हटले.

यापूर्वीही चिदंबरम यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) सल्ला दिला होता. आपल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी चांगल्या व्यवस्थापकांची नेमणूक करावी. सरकारचे कार्यक्रम चांगले आहेत पण त्याची अंमलबजावणी करणारे व्यवस्थापक अयोग्य आहेत. आर्थिक सर्वेक्षणाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, सरकारच्या काही कल्याणकारी योजना स्वच्छ भारत, ग्रामीण विद्युतीकरण आणि एलपीजी वितरणाच्या योजना अजूनही वास्तविक परिणाम साधू शकले नसल्याचे म्हटले.

एका अहवालाचा दाखला देत ते म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय तयार करण्यात आले आहेत. पण त्याला पाण्याची जोडणीच दिलेली नाही. पंतप्रधानांच्या अथवा सरकारच्या हेतूबद्दल कोणीही शंका उपस्थित केलेली नाही. मला विश्वास आहे की, त्यांचा हेतू चांगला आहे पण यावरून सिद्ध होते की, सरकारकडे कार्यक्रम चांगले आहेत पण तो राबवण्यासाठी योग्य व्यवस्थापक नाही.

जर शौचालय योजना व्यवस्थित राबवली जावे असे तुम्हाला वाटत असेल तर चांगले व्यवस्थापक नेमा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. सरकारचा नवा अर्थसंकल्प शेतकरी, युवक आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या दूर करण्यामध्ये अपयशी ठरला आहे. कृषी क्षेत्रातील वाढत थांबल्याचे आर्थिक सर्वेक्षणात सांगितल्याचे दिसते. हे चांगले संकेत नाहीत. कारण देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.