Wrath Of God Mission : २२ एप्रिल २०२५ या दिवशी काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला करुन २६ निरपराध पर्यटकांना धर्म विचारुन ठार केलं. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची बाब समोर आली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर राबवत एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करत उत्तर दिलं. या मध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले आणि त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानला लक्षात राहिल असा धडा भारताने शिकवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. १० मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रविराम केला. यानंतर अनेकांना रॅथ ऑफ गॉड या इस्रायलच्या खास मोहीमेची आठवण आली आहे. ही मोहीम काय होती? या मोहिमेतून इस्रायलने पॅलेस्टाईनला उत्तर कसं दिलं ते समोर आलं आहे.

१९७२ मध्ये काय घडलं?

१९७२ मध्ये म्हणजेच ५३ वर्षांपूर्वी जर्मनीने ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यातून जर्मनीला हा संदेश द्यायचा होता की आम्ही आता बदललो आहोत. १९३६ मध्ये हिटलरने जर्मनीत ऑलिम्पिकची स्पर्धा घेतली होती. त्यानंतर १९७२ ला ऑलिम्पिक घेण्यात आलं. ज्याचा विषय निघाला तरीही एक नकोशी आठवण जगाला येते. ५ सप्टेंबर १९७२ ला पहाटे चारच्या दरम्यान ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी कट्टरपंथी गटाने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला. म्युनिकच्या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आल्यानंतर या कट्टरपंथीयांनी इस्रायलचे अॅथलिट जिथे थांबले होते तो फ्लॅट गाठला. एका मास्टर की ने तो फ्लॅट उघडला. त्यावेळी पॅलेस्टाईनच्या कट्टरपंथीयांनी दोन अॅथलिट्सना ठार केलं. त्यानंतर इस्रायलच्या नऊ अॅथलिटना काही कोच मंडळींना बांधलं आणि ताब्यात घेतलं. त्यांना ओलीस ठेवून मागणी केली की पॅलेस्टाईनच्या २०० कैद्यांची सुटका करा. या सगळ्यांना इस्रायलच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. पॅलेस्टाइनचे हे कट्टर पंथीय सगळ्या ओलिसांना घेऊन जर्मनीतल्या एका विमानतळावर गेले. तिथे जर्मनीच्या सुरक्षा दलांनी ओलिसांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. जर्मनीतल्या सुरक्षा दलांनी हा प्रयत्न केल्याने पॅलेस्टाईनचे कट्टर पंथीय चांगलेच चवताळले आणि त्यांनी एक एक करुन ओलिसांची हत्या करण्यास सुरुवात केली. इस्रायल ऑलिम्पिक समितीच्या नऊ सदस्यांनाही त्यांनी ठार केलं. या दरम्यान पश्चिम जर्मनीतले एक पोलीस अधिकारीही ठार झाले.

What is Wrath Of God Mission?
इस्रायलने राबवलेली विशेष मोहीम रॅथ ऑफ गॉड काय होती? (फोटो-फेसबुक पेज)

इस्राएलचा जर्मनीवर आरोप काय?

जर्मन सुरक्षा दलांची पॅलेस्टाईन कट्टरतावाद्यांशी जी चकमक झाली त्यात आठ पैकी पाच जण मारले गेले. त्यानंतर अदनान अल गाशे, जमाल अल गाशे आणि मोहम्मद सफादी यांना जर्मनीच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण नंतर त्यांना सोडावं लागलं. कारण पॅलेस्टाईनच्या कट्टर पंथीयांनी जर्मनीच्या लुफ्तांसा एअरलाईन्सचं अपहरण केलं आणि लोकांच्या सुटकेच्या बदल्यात या तिघांची सुटका करुन घेतली. या तिघांना नंतर लिबियाला पाठवलं गेलं होतं. गडाफीने या तिघांना हिरो जाहीर केलं. त्यानंतर ब्लॅक सप्टेंबर या कट्टर पंथीयांच्या समूहात जे सहभागी होते त्यांची हत्या करण्यात आली. या हत्यांचा आरोप इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांवर लावण्यात आला. इस्रायलने या हत्यांसाठी जी विशेष मोहीम राबवली गेली त्या मोहिमेचं नाव होतं ‘रॅथ ऑफ गॉड’. या मोहिमेत १९९० पर्यंत ब्लॅक सप्टेंबरमध्ये असलेल्या सगळ्यांचा खात्मा झाला फक्त जमाल अल गाशे हा वाचला. साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी इस्रायलच्या काही गुप्त फाईल्स समोर आल्या होत्या. त्यात इस्रायलने म्युनिकमध्ये ज्या त्यांच्या खेळाडूंच्या हत्या झाल्या त्यासाठी जर्मनीच्या सुरक्षा दलांना जबाबदार धरलं होतं. ऑलिम्पिकची सुरक्षा पाहणारे पोलीस आणि जर्मनीतले पोलीस हे आमच्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना वाचवू शकले नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं. या भीषण नरसंहारानंतरही ऑलिम्पिकची स्पर्धा १९७२ मध्ये पार पडली होती. या स्पर्धेत जर्मनीने २० पदकं जिंकली होती.

रॅथ ऑफ गॉड मोहीम काय होती?

इस्रायलचे त्यावेळचे पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी त्यांच्या संसदेत दहशतवादाविरोधात आमचं युद्ध होणार अशी घोषणा केली. आमच्या देशातील खेळाडूंची हत्या ज्यांनी केली त्यांना आम्ही सोडणार नाही असंही ते म्हणाले. त्यानंतर हल्ल्यासाठी जे लोक जबाबदार होते त्यांची ओळख पटावी म्हणून एक गुप्त समिती तयार केली. त्यानंतर इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांपैकी मोसादला या पॅलेस्टाईन कट्टरपंथीय आणि त्यांचे सूत्रधार या सगळ्यांची हत्या करा असे आदेश देण्यात आले. ही मोहीम राबवताना प्रचंड गुप्तता पाळली गेली होती. त्यानंतर राबवण्यात आलं ते रॅथ ऑफ गॉड हे गुप्त ऑपरेशन ज्या अंतर्गत ब्लॅक सप्टेंबरच्या सगळ्या दहशतवाद्यांना शोधून शोधून ठार करण्यात आलं. मोसादने या मोहिमेत १२ हून अधिक पॅलेस्टाईनी कट्टरपंथीयांना ठार शोधून मारलं.

स्टिवन स्पिलबर्गचा सिनेमा म्युनिक

जगात दोन देशांमध्ये घडलेली ही घटना अशी होती की त्यावर कुणाला चित्रपट बनावावासा वाटला नसता तरच नवल होतं. स्टीवन स्पीलबर्गने या घटनेवर आधारित म्युनिक नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात ब्लॅक सप्टेंबर ग्रुपने केलेल्या हत्या आणि पुढे २० वर्षे चाललेली मोहीम रॅथ ऑफ गॉड यावर सविस्तर भाष्य कऱण्यात आलं होतं.

What is Wrath Of God Mission?
रॅथ ऑफ गॉड या मोहिमेवर म्युनिक हा चित्रपट तयार कऱण्यात आला होता. (फोटो-फेसबुक)

मोसादने कशा हत्या केल्या?

१६ ऑक्टोबर १९७२ ला रॅथ ऑफ गॉड या मोहिमेच्या अंतर्गत वेल जेवेतर नावाच्या एकाला ठार करण्यात आलं. तो पॅलेस्टाईनी भाषांतरकार होता. त्यानंतर पुढची २० वर्षे ही मोहीम सुरु होती. जेवेतर हा रोमच्या ब्लॅक सप्टेंबर ग्रुपचा प्रमुख होता असं नंतर मोसादने सांगितलं. त्यानंतर ठार करण्यात आलं ते महमूद हमशारीला. महमूद हमशारी फ्रान्समध्ये होते. ८ डिसेंबर १९७२ ला त्यांच्या डेस्कवर असेलल्या फोनचा स्फोट झाला आणि त्यांची हत्या करण्यात आली. पुढची २० वर्षे या हत्या मोसादकडून अशाच पद्धतीने सुरु होत्या. युरोपात ब्लॅक सप्टेंबर समूह चालवणाऱ्या मोहम्मद बेदियाला कारमध्ये बॉम्बस्फोट करुन ठार कऱण्यात आलं. रॅथ ऑफ गॉड ही मोहीम राबवण्यामागे जे खेळाडू मारले गेले त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देणं हाच हेतू होता. इस्रायलला यातून संदेश द्यायचा होता की आमच्या देशातल्या नागरिकांना हात लावाल तर तुम्हाला सोडणार नाही. बीबीसीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतिहास अभ्यासक मायकल ब्रेनर यांनी काय म्हटलं आहे?

इस्रायल विद्यापीठाचे इतिहास अभ्यासक मायकल ब्रेनर म्हणतात की जर्मनीतल्या अधिकाऱ्यांनी तीन कट्टरपंथीयांना अटक केली होती. मग त्यांनी या सगळ्यांना इतक्या सहजपणे का सोडून दिलं? लुफ्तांसा विमानाचं अपहरण हे जर्मनीचं षडयंत्र होतं. यामागे एकच हेतू होता ज्यांना अटक केली आहे त्यांना सोडणं आणि जर्मनीच्या बाहेर पाठवणं. त्यामुळे इस्राएलवर दुहेरी अन्याय झाला. त्यामुळे रॅथ ऑफ गॉड राबवून आम्ही हेच जगाला दाखवून दिलं की जे जर्मनी करु शकला नाही ते आम्ही करुन दाखवलं. माझ्या मते ही मोहीम आम्ही फत्ते केली.