याहूची मेल आणि अन्य सेवा वापरणाऱ्या वाचकांनी आवर्जून वाचावी, अशी बातमी आहे. याहूच्या जगभरातील सुमारे ५० कोटी युजर्सच्या अकाऊंटमधील माहिती हॅकर्सनी चोरल्याचे खुद्द कंपनीने जाहीर केले आहे. त्याचबरोबर आपल्या युजर्सना तातडीने ई-मेलचे आणि अन्य सुविधांचे पासवर्ड बदलण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यांकडून याहूची सेवा वापरली जाते. त्यांनीही वैयक्तिक पातळीवर सुरक्षेसाठी उपाय योजावेत, असे खुद्द कंपनीनेच म्हटले आहे. हॅकिंगची हे काम अगदी अलीकडील नसून, ते २०१४ पासून सुरू असल्याचे सांगत कंपनीने अनेकांना धक्काच दिला आहे. त्यामुळे युजर्सची कोणत्या स्वरुपाची आणि किती मोठ्या प्रमाणातील माहिती हॅक झाली याबद्दल सध्यातरी ठोसपणे काहीही सांगता येणार नाही.
या हॅकिंगचा सर्वात मोठा फटका खुद्द कंपनीलाही बसणार आहे. याहूने आपला मुख्य व्यवसाय ४.८ अब्ज डॉलरला व्हेरिझॉनला विकण्याचे निश्चित केले होते. आता या व्यवहारावरही हॅंकिंगचा परिणाम होऊ शकतो. आपल्याला अगदी दोनच दिवसांपूर्वी याहूचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समजली असल्याचे व्हेरिझॉनने म्हटले आहे. या हॅंकिगचे दूरगामी परिणाम याहूला भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर व्हेरिझॉनसोबतच्या करारातील तरतुदींमध्ये बदल होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. तूर्ततरी पुढे काय घडते, याची वाट पाहावी लागेल, असे तज्ज्ञांना वाटते.
व्हेरिझॉनसोबतचा करार होण्यापूर्वी की करार झाल्यानंतर हॅकिंगची माहिती समजली, याबद्दल याहूच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. २०१४ मध्ये अशा पद्धतीने माहितीची चोरी करण्याला सुरुवात झाली, असे आमच्या लक्षात आले आहे, असे याहूने म्हटले आहे.