सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा ‘गांधी शांती यात्रा’ काढणार आहेत. आजपासून (गुरुवार) या यात्रेला सुरुवात होणार असून मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथून ही यात्रा सुरू होणार असून अनेक राज्यांमधून मार्गक्रमण करीत ती पुढे दिल्ली येथे संपणार आहे.

सरकारने संसदेत एनआरसी रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी या गांधी शांती यात्रेद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा येथून जात ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी राजघाटावर ही यात्रा संपणार आहे.

भाजपा सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी नुकतीच मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली होती. दिल्लीच्या जामिया मिल्लिया इम्लामिया विद्यापीठाच्या भेटीदरम्यान सिन्हा म्हणाले होते, केंद्र सरकारने काश्मीरला देशातील इतर राज्यांप्रमाणे बनवण्याचा दावा केला होता. मात्र, परिस्थिती अशी बनली आहे की, आता संपूर्ण देशच काश्मीर बनला आहे.