वय वर्षे केवळ १३ आणि यंदाची आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या सत्यमकुमार या विद्यार्थ्यांचे आदर्श आहेत थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन! सत्यमकुमार हा एका शेतकऱ्याचा मुलगा असून तो यंदा सलग दुसऱ्यांदा आयआयटी-जेईई ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
सत्यमकुमार याचा जन्म बिहारच्या भोजपूर जिल्हय़ात २० जुलै १९९९ रोजी सिद्धार्थ सिंग या गरीब शेतकऱ्याच्या घरात झाला. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी म्हणजेच गेल्या वर्षी त्याने सीबीएसई मंडळाकडून विशेष परवानगी घेऊन आयआयटी प्रवेश परीक्षा दिली आणि तो पात्र ठरला. परंतु त्याला ८१३७ इतकी खालची श्रेणी मिळाल्याने तो समाधानी नव्हता म्हणून त्याने यंदाही परीक्षा दिली.
यंदाच्या परीक्षेत सत्यमकुमारने देशभरात ६७९ वी श्रेणी पटकावली. गेल्या वर्षी कमी श्रेणी मिळाली होती, त्यामुळे आपण समाधानी नव्हतो, त्यामुळे यंदाच्या परीक्षेला बसलो आणि अधिक वरची श्रेणी मिळेल हा आत्मविश्वास होता, असे सत्यमकुमार याने सांगितले. सत्यमकुमारच्या यशाची गोष्ट थक्क करणारी आहे. त्याचे काका पशुपती सिंग हे वीर कुएर सिंग या स्थानिक महाविद्यालयात कारकून आहेत. बिकटआर्थिक स्थिती आणि गावातील सरकारी शाळेत सुविधांचा अभाव यामुळे आठव्या इयत्तेपर्यंत सत्यमकुमारने औपचारिक शिक्षणही घेतलेले नाही, असे त्याच्या काकांनी सांगितले. त्यामुळे आम्ही त्याला घरातच मूलभूत शिक्षण दिले, असेही ते म्हणाले. सत्यमकुमार २००७ मध्ये प्रथम इयत्ता आठवीत शाळेत गेला. त्याच्या शिक्षणाचा आणि आयआयटी परीक्षेच्या शिकवणीचा खर्च प्राचार्य आर. के. वर्मा यांनी उचलला, असे त्याच्या काकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngest iit qualifier satyam wish to do einstein
First published on: 26-06-2013 at 01:31 IST