लग्न करण्यास नकार दिल्यामुळे एका तरुणीने आपल्या प्रियकराचेच अपहरण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. उत्तर प्रदेशातील चमनसराई भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाचे अपहरण करण्यास संबंधित तरुणीला तिच्या दोन मित्रांनीही मदत केली.
पोलिसांनी तरुणी आणि तिच्या दोन मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. फहीम असे अपहरण करण्यात आलेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी फहीम दिल्लीमध्ये शिवणकामाचा व्यवसाय करीत होता. त्यावेळी त्याची संबंधित तरुणीबरोबर ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन वर्षांपूर्वी फहीम दिल्ली सोडून अहमदाबादला जाऊन राहू लागला. त्यावेळी या दोघांमधील संपर्क पूर्णपणे तुटला होता, असे फहीमच्या भावाने पोलिसांना सांगितले. मात्र, फहीमसोबत लग्न करण्यासाठी संबंधित तरुणी इच्छूक होती आणि त्यातूनच गुरुवारी संध्याकाळी ती फहीमच्या घरी आली. त्यानंतर तरुणीने आणि तिच्या दोन मित्रांनी फहीमला त्याच्या घरातून पळवून नेले, अशी तक्रार फहीमच्या भावाने केली.