काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून शांतता निर्माण करण्यासाठी सर्व पक्षीयांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचे सांगत येथील युवकांच्या हाती दगडांऐवजी पेन आणि लॅपटॉपची गरज आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. जम्मू काश्मीर दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या समवेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काश्मीरशिवाय भारत स्वत:चे भविष्य बघूच शकत नाही, असेही त्यांनी या वेळी ठामपणे म्हटले. जम्मू काश्मीर खोऱ्यात गेल्या ४८ दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे.
राजनाथ सिंह यांचा जम्मू काश्मीरचा हा दुसरा दौरा आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राज्यातील मुस्लिम समाजातील विविध गटाच्या तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. याबाबत बोलताना सिंह म्हणाले, या वेळी आम्ही विविध विचारधारा असलेल्या नव्या लोकांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. या गंभीर परिस्थितीवर मात काढण्यासाठी सर्वांचा सल्ला घेतला. काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असून लवकरच सर्व पक्षीयांशी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरशिवाय भारत स्वत:चे भविष्य पाहू शकत नाही. येथील युवकांच्या हातात दगडांऐवजी पेन, लॅपटॉप हवा. येथे शांतता निर्माण होण्यासाठी मला सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे, असे म्हणत सिंह यांनी काश्मिरी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना लवकरच शोधले जाईल, असा आशावाद व्यक्त केला.
आमच्यावर शंका घेऊ नका
जम्मू काश्मीरमधील समस्येबाबत लवकरच केंद्राच्या वतीने नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी या वेळी सांगितले. येथील समस्येबाबत लगेचच नोडल ऑफिसरशी संपर्क साधता येईल. तसेच हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलाकडून वापरण्यात येणाऱ्या पॅलेट गनचा पर्याय शोधण्यात येईल. राज्य सरकार समान कार्यक्रम राबवण्यास कटिबद्ध असून आमच्यावर कोणीही शंका घेऊ नका, असे त्यांनी या वेळी म्हटले.
पाच टक्के लोकांमुळे परिस्थिती बिघडली
काश्मीर खोऱ्यातील ९५ टक्के लोकांना शांतता हवी असून केवळ ५ टक्के लोक या प्रकरणाचे राजकारण करत असल्याने येथील परिस्थिती बिघडल्याचा आरोप मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी यावेळी केला.