Bihar Election Result: बिहारमधील लोकप्रिय युट्यूबर आणि प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे उमेदवार मनीष कश्यप यांचा बिहार विधानसभा निवडणुकीत चनपटिया विधानसभा मतदारसंघातून ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. युट्यूबवर ९५ लाख सबस्क्राइबर असलेल्या मनीष कश्यप यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते निवडून येतील, असा पक्षाला विश्वास होता. मात्र प्रशांत किशोर यांच्या एकाही उमेदवाराला विजयाचे खाते उघडता आलेले नाही.

मनीष कश्यप यांचे नाव त्रिपुरारी कुमार तिवारी असे आहे. चनपटिया मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिषेक रंजन यांचा विजय झाला आहे. तर भाजपाचे उमेदवार उमाकांत सिंह दुसऱ्या स्थानावर आहेत. अवघ्या ६०२ मतांनी भाजपाच्या सिंह यांचा पराभव झाला. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या मनीष कश्यप यांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.

३४ वर्षीय पदवीधर असलेले मनीष कश्यप युट्यूबवर लोकप्रिय आहेत. त्यांच्या सन ऑफ बिहार या चॅनेलचे ९५ लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी कश्यप स्थानिक विषय, सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे व्हिडीओ पोस्ट करत होते. त्यातून त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

२०२३ मध्ये, बिहारमधील स्थलांतरित मजूरांवरील हल्ल्याबाबत चुकीची माहिती पसरवल्याबद्दल त्यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली होती. २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. पण त्यांचा डिजिटल जगतात असलेला प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी जनसुराज पक्षाची निवड केली. जनसुराज पक्षाच्या तिकिटावर सहज विजह होईल, अशी त्यांची अटकळ होती. त्यामुळे त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि प्रशांत किशोर यांच्या पक्षात प्रवेश केला.

किती मतदान मिळाले?

चनपटिया मतदारसंघात काँग्रेसच्या अभिषेक रंजन यांनी ८७,५३८ मते घेतली. तर भाजपाच्या उमाकांत सिंह यांना ८६,९३६ मते मिळाली. ६०२ मतांनी सिंह यांचा पराभव झाला. तर मनीष कश्यप यांना ३७,१७२ मते मिळाली. त्यांचा तब्बल ५० हजार ३६६ मतांनी पराभव झाला.

manish-kashyap-bihar-chanpatia-assembly-seat
चटपटिया विधानसभा मतदारसंघाचा निकाल.

संपत्ती किती?

मनीष कश्यप यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी एकूण ८८.४ लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. ज्यामध्ये ५३.४ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि १७ लाखांचे कर्जही समाविष्ट आहे. कश्यप यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडियावर कितीही प्रसिद्ध असलात तरी स्थानिक राजकारणात टिकाव लागणे अवघड आहे, हे पुन्हा एकदा मनीष कश्यप यांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.